लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : केंद्र व राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत 'सखी निवास' ही योजना राबविली जात आहे. वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांना सुरक्षित निवारा मिळावा, या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. शासनाने नोकरी करणाऱ्या महिलांना राहण्यासाठी सखी निवास ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या लाभासाठी शासनाने काही अटी व शर्थीची पूर्तता करणाऱ्या व पात्र असलेल्या नोकरदार महिलांसाठी सखी निवास योजनेत या महिलेसमवेत १८ वर्षांपर्यंतची मुलगी व ५ वर्षांपर्यतचा मुलगा राहू शकतो. नोकरी करणाऱ्या महिलांना सखी निवास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महिला बालकल्याण विभागाकडून उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात ६ संस्थांमध्ये ही सुविधा सुरू केली होती. मात्र, यापैकी चार संस्था बंद पडल्या आहेत. आजघडीला २ संस्थांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची राहण्याची व्यवस्था केली जात आहे. यामध्ये दोन्ही मिळून २३ महिला सखी निवास योजनेचा लाभ घेत आहेत.
काय आहे सखी निवास योजना?
राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांना सुरक्षित असा निवारा मिळावा, या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. अशा महिलांच्या निवासासाठी सध्या अतित्वात असलेल्या वसतिगृहाव्यक्तिरिक्त हे सखी निवास असतील. या योजनेला केंद्र शासनाच्या 'मिशन शक्त्ती' उपक्रमाचे साहाय्य मिळाले आहे. 'मिशन शक्ती' अंतर्गत 'संबल आणि सामर्थ्य या दोन उपयोजना राबविल्या जातात. त्यापैकी 'सामर्थ्य उपयोजनेअंतर्गत 'सखी निवास योजना कार्यान्वित करण्यासाठी अर्थसाहाय्य केले जाते. यात केंद्राचा ६० टक्के आणि राज्याचा ४० टक्के वाटा आहे.
नोकरदार महिलांची सोय घरापासून दूर शहरांमध्ये अनेक महिला नोकरी करतात. त्यांना सुरक्षित निवारा मिळावा, या उद्देशाने शासनाने 'सखी निवास' ही योजना सुरू केली आहे. पूर्वी ही योजना महिला वसतिगृह या नावाने ओळखली जात होती. सखी निवासामुळे नोकरीदार महिलांची सोय होणार आहे.
निकष काय ? या योजनेअंतर्गत नोकरी करणाऱ्या महिलांचे मासिक उत्पन्न ५० हजारांपेक्षा जास्त नसावे. संबंधित शहरात या महिलेच्या जवळच्या नातेवाइकांचे निवासस्थान नसावे. तीन वर्षांपेक्षा कोणत्याही महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदी निकष पूर्ण करणाऱ्या नोकरदार महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.
किती नोकरदार महिलांना मिळाला लाभ? अमरावती जिल्ह्यात सहापैकी चार संस्थांनी सुरू केलेले सखी निवास बंद पडले आहे; तर शहरात दोन ठिकाणी सखी निवास सुविधा केंद्रे सुरू आहेत. या ठिकाणी २३ शासकीय नोकरदार महिला आजघडीला शहरातील दोन 'सखी निवास' सुविधेचा लाभ घेत आहेत.
"नोकरदार महिलांसाठी सुखदायी आणि दिलासादायी ठरू पाहणारी 'सखी निवास सुविधा' ही शहरात दोन ठिकाणी सुरू आहे. शासनाच्या या योजनेचा लाभ नोकरदार महिला घेऊ शकतात." - उमेश टेकाळे, महिला व बालविकास अधिकारी