सुरेश सवळे - चांदूरबाजारशासनाने व जिल्हाधिकारी कार्यालयाने गारपीट नुकसानीचे अनुदान संबंधित विभागाला दिले; त्यानंतरही चांदूूरबाजार तालुक्यातील आठ हजार शेतकरी सात कोटींच्या अनुदानापासून अद्याप वंचित असल्याचे उपलब्ध आकेडवारीवरून स्पष्ट झाले आहे. अशातच राष्ट्रीयीकृत बँका वगळून शिरजगाव कसबा येथील विदर्भ-कोकण क्षेत्रीय ग्रामीण बँकेत १२ कोटींचे अनुदान जमा करण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न शेतकर्यांमार्फत उपस्थित केला जात आहे. ऐन पेरणीच्या मोसमात काही का होईना हेक्टरी १५ हजार रूपयांचे अनुदान मिळणार म्हणून शेतकरी शाश्वत होता. मात्र, या रखडलेल्या अनुदानामुळे आता त्या शेतकर्यांना नाईलाजास्तव सावकाराचे दार ठोठवावे लागत आहे. चांदूरबाजार तालुक्यातील गारपीट नुकसानग्रस्त २३ हजार ८४४ शेतकर्यांना १२ कोटी ५१ लाख ४0 हजार ८0२ रूपयांच्या अनुदानाचे वाटप करायचे होते. त्यातील ४ कोटी ९५ लाख ४0 हजार ८0२ रूपयांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर ७ कोटी ५६ लाख रूपयांच्या अनुदानाचे बीडीएस जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसील कार्यालयाला २0 मे रोजी प्राप्त झाले. मात्र, त्यानंतर दप्तर दिरंगाईमुळे हे बिल ३ जूनपर्यंत कोषागार कार्यालयातून पास झाले नाही. त्यानंतर ही रक्कम दोन वर्षांंपूर्वी तालुक्यात दाखल झालेल्या शिरजगाव कसबा येथील विदर्भ-कोकण क्षेत्रीय बँकेत जमा करण्यात आली. आता ही रक्कम वटविण्यासाठी करण्यात येणार्या प्रक्रियेमुळे अनुदान वाटपात विलंब होत आहे. चांदूरबाजार शहरात जिल्हा मध्यवर्ती बँकेसह पाच ते सहा राष्ट्रीयीकृत बँका असताना १८ किलोमीटर अंतरावरील क्षेत्रीय बँकेत रक्कम जमा करून या बँकेमार्फत इतर बँकेत अनुदान वळविण्याचा महसूल प्रशासनाचा तुघलकी निर्णयसुध्दा बँक व शेतकरी वतरुळात चर्चेचा विषय ठरला आहे. अनुदानाची रक्कम अधिक काळ आपल्या बँकेत जमा राहावी, या स्वार्थी हेतूने या बँका मनुष्यबळाच्या अभावाची कारणे सांगून शेतकर्यांना व त्यांना मिळणार्या रकमेला वेठीस धरण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. इतकेच नव्हे तर एक शाखाधिकारी व एक लिपिक अशा दोन कर्मचारी असलेल्या विदर्भ क्षेत्रीय बँकेकडून धनादेश ‘क्लिअरिंग’ तातडीने करण्याची अपेक्षा कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याऊलट तालुक्यातील ४0 हजार २३६ अतवृष्टीग्रस्त शेतकर्यांची २७ कोटी २७ लाख ९0 हजार २७४ रूपयांच्या नुकसानीच्या रकमेपोटी आतापर्यंत २१ कोटी ६६ लाख ५५ हजार ७८३ रूपये स्टेट बँकेमार्फत वाटप करण्यात आले. अजूनही २ हजार ४९७ शेतकर्यांना ५ कोटी इतकी रक्कम वितरित करणे बाकी आहे. असे असताना गारपिटीची रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत का जमा करण्यात आली नाही? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गारपिटीचे अनुदान क्षेत्रीय बँकेत कशासाठी?
By admin | Published: June 08, 2014 11:33 PM