अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ऑनलाइन मूल्यांकन गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑनलाइन मूल्यांकनाच्या अनुषंगाने खरेदी करण्यात आलेल्या १६ लाख उत्तरपत्रिकांचे आता काय करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. परीक्षेसंबंधी कामकाज तडकाफडकी ऑफलाइन सुरू करण्यात येत असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का मिळाला आहे.
विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी २६ मार्च २०१९ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार लर्निंग स्पायरल प्रा.लि. (कोलकाता), माइंड लॉजिक्स इफ्राटेक लिमिटेड (बंगळुरू) या दोन्ही कंपन्यांंकडून उन्हाळी २०१९ परीक्षांच्या कामकाजाबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आले. त्यानुसार उन्हाळी परीक्षांचे नियोजन झाले असून, २५ एप्रिलपासून अभियांत्रिकीच्या ऑनलाइन परीक्षांना सुरुवात झाली. मात्र, अभियांत्रिकी ऑनलाइन परीक्षांमध्ये एकच गोंधळ उडाला. पहिल्याच दिवशी पेपर तास-दीड तास उशिराने घेण्यात आला. परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयांवर पेपर न पोहोचल्याने ऑनलाइन प्रणालीचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले. परीक्षेसंबंधी डेटा अपलोड झालाच नाही, ही बाब विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला कालातंराने लक्षात आली. खासगी कंपनीवर विसंबून काय स्थिती निर्माण होते, याचा प्रत्यक्ष अनुभव परीक्षा व मूल्यांकन मंडळाने घेतला. त्यामुळे यंदा उन्हाळी परीक्षेत ऑनलाइन मूल्यांकन गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ऑनलाइन परीक्षेकरिता खरेदी करण्यात आलेल्या १६ लाख बारकोड उत्तरपत्रिकांचे काय करायचे, हा गंभीर प्रश्न विद्यापीठ प्रशासनासमोर उपस्थित झाला आहे. बारकोड उत्तरपत्रिका प्रत्येकी २० रूपये दराने खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे.
बारकोड उत्तरपत्रिका पुढील शैक्षणिक सत्रात वापरता येतील. ऑनलाइन परीक्षेबाबत लवकरच नवीन कंपनीचा शोध घेतला जाणार आहे. त्यानंतर नियमावलीनुसार नव्या एजन्सीला कामकाज सोपविले जाईल. - हेमंत देशमुख संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ
अभियांत्रिकी परीक्षेत बारकोड उत्तरपत्रिकांचा वापरविद्यापीठाने ऑनलाईन मूल्यांकनाला ब्रेक लावला आहे. मात्र, उन्हाळी २०१९ अभियांत्रिकी परीक्षेत बारकोड उत्तरपत्रिकांचा वापर केला आहे. त्यामुळे अभियांत्रिकीचे ऑफलाइन मूल्यांकन करताना बारकोड उत्तरपत्रिकांचे डेटा कसा ट्रान्सफर केला जाईल, याविषयी विद्यापीठात जोरदार मंथन सुरू आहे. ऑनलाइन मूल्यांकन बंद झाल्यामुळे आता ऑफलाइन मूल्यांकनाद्वारे ४५ दिवसांत निकाल लावण्याची परीक्षा विद्यापीठाला द्यावी लागणार आहे, हे विशेष.