प्रभाकरराव वैद्य यांची माहिती : हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची अशीही महतीइंदल चव्हाण - अमरावतीहनुमान व्यायाम प्रसारक मंडळांतर्गत येथे ३० डिसेंबर १९२६ साली सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांचा शारीरिक कौशल्यावर आधारित प्रात्यक्षिक सादर करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राष्ट्रपिता महात्मा गांधी होते. त्यावेळी विद्यार्थ्यांची एकोप्याची भावना बघून महात्मा गांधी भावूक झाले होते. त्यांनी काही दिवसांपासून सुरू ठेवलेले मौन येथे सोडले होते, अशी माहिती हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ३० जानेवारी रोजी पुण्यतिथी शहरात विविध शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांत संपन्न होणार आहे. त्यांनी अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात दिलेली भेट अविस्मरणीय आहे. संस्थेच्या खास निमंत्रणावरून महात्मा गांधी गोहत्ती काँग्रेस जाण्यापूर्वी मुद्दाम नवीन इमारतीच्या अनावरण समारंभासाठी आपल्या एक वर्षासाठी मौनव्रतानंतर ते २१ डिसेंबर १९२६ रोजी अमरावती येथे आले होते. त्यांच्या स्वागताकरिता डॉ. सोमण यांच्या नेतृत्वात स्वयंसेवकांची एक तुकडी बडनेरा मुक्कामी रवाना झाली होती. महात्माजी गाडीतून उतरताक्षणीच प्लॅटफॉर्मवर स्वयंसेवकांनी त्यांना सलामी दिली.महात्मा गांधी भारावलेपुष्पहार अर्पण करून त्यांना आमरावतीतील शेठ शिवनाथ बाबू यांच्या बगिचात आणले गेले. तेथे अल्पोपाहार घेऊन शेठ जन्मनलाल महादेवभाई देसाई, शेठपन्नालाल, राधावल्लभ लढ्ढा आदी मंडळींसह व्यायाम मंदिरात आले. भर दुपारी २ वाजता बापूंच्या दर्शनासाठी १० हजार जनसुदाय उसळला होता. चोख व्यवस्थेसाठी संस्थेच्यावतीने ३०० स्वयंसेवक तैनात होते. शंभर भालाईतांची गार्ड आॅफ आॅनर्सची सलामी घेत महात्मा गांधी अध्यक्षस्थानी विराजमान झाल्यानंतर डॉ. सोमण यांनी प्रास्ताविकातून संस्थेची थोडक्यात माहिती सांगून गांधीजींना इमारतीचा अनावरण करण्याची विनंती केली. महात्माजींनी इमारत उघडली. 'सगळ्या वऱ्हाडात मध्यप्रांतांत तर त्यांच्या आखाड्यासारखा दुसरा आखाडा नाहीच. परंतु सबंध हिंदुस्थानातही त्याला जोड नाही आणि तो आहेच तसा, असे म्हणत गांधीजींनी १० मिनिटे भाषण केले होते. ते म्हणाले 'या आखाड्यात हिंदू-मुसलमान दोघांनाही सारखाच प्रवेश मिळतो आणि मुसलमानच काय पण अस्पृश्य तरुणदेखील त्याचे सभासद आहेत. माझ्यासारख्या नितांत अहिंसावाद्याने या आखाड्यासारख्या संस्थेशी अशाप्रकारे सहकार्य का व कसा केला त्याचे कारण स्पष्टच आहे. अहिंसा हिंसा करण्याच्या शक्तीचा त्याग करणे यास्तव ज्यामध्ये ही करण्याची शक्ती नाही तो अहिंसाही करू शकत नाही. जातीय विद्वेषापासून ही संस्था अलग आहे, हे पाहून मला हर्ष झाला, असे त्यांनी सांगितले होते. हव्याप्र मंडळात विविध जाती, धर्माचे विद्यार्थी शारीरिक शिक्षण घेत होते. त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ संस्थेच्यावतीने शारीरिक कौशल्यावर आधारित डेमोस्ट्रेशन घेण्यात आले. विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून महात्मा गांधी भारावून गेले आणि म्हणाले ''ही संस्था भविष्यात फार मोठी होणार'' त्यांचे स्वप्न आज खरे ठरले आहे. या संस्थेत विविध राज्यांतून विद्यार्थी येथे शिक्षण घेण्याकरिता येत आहेत. यावेळी दाजीसाहेब पटवर्धन, आचार्य त्र्यंबक जोशी, अंबादासपंत वैद्य, अहिरराव देशपांडे, स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असलेले वीर वामनराव जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
भारावलेल्या महात्मा गांधींनी सोडले अमरावतीत मौन
By admin | Published: January 29, 2015 10:57 PM