अचलपूर-परतवाडावासीयांना दूषित पाणी, नागरिक विविध आजारांनी त्रस्त, आरओ प्लांटसह गळतीकडे दुर्लक्ष
अनिल कडू
परतवाडा : अचलपूर-परतवाडावासी पिण्याच्या दूषित पाण्याने त्रस्त आहेत. त्यांना विविवध आजारांनी ग्रासले असून, पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनवरील गळतीसह थंड पाणी पुरविणाऱ्या आरओ प्लांटकडे अचलपूर नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे.
अचलपूर नगरपालिका क्षेत्राला चंद्रभागा धरणावरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईनसह शहरातील वितरण प्रणालीतील पाईप लाईनवर अनेक ठिकाणी गळती आहे. यातील काही ठिकाणाची गळती मागील चार-पाच वर्षांपासून आहे. काही ठिकाणच्या गळतीचा तर पाणीपुरवठा विभागाला पत्ताच लागलेला नाही.
नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरणाऱ्या आक्षेपार्ह ठिकाणावरून ही पाणीपुरवठ्याची पाईप लाईन गेली आहे. या ठिकाणीही गळती बघायला मिळत असून, पाण्याचे शुद्धीकरण न करता रोड साईडला असणाऱ्या बोअरवेलमधून सरळ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. असे असताना नागरिकांना पुरविले जाणारे पिण्याचे पाणी अयोग्य असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट केले जात आहे. पाण्याचे नमुने घेतले जातात. या नमुन्याच्या प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालात पाणी योग्य असल्याचे नमूद असल्याचे नगरपालिकेचे म्हणणे आहे.
बॉक्स
नमुने कुठले?
पिण्याच्या पाण्याचे हे नमुने कुठले आहेत, नगरपालिका हे नमुने केव्हा आणि कधी गोळा करते, याची माहिती मात्र नागरिकांना नाही. कित्येक वर्षात काही भागात तर पाण्याचे नमुने घेतले गेलेले नाहीत. हे पाण्याचे नमुने सार्वत्रिक व नियमित घेतले जात नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनवरील वारेमाप गळती आणि शुद्धीकरण प्रक्रिया न होता बोअरवेलमधून सरळ येणारे पाणी बघता, त्या अहवालावरच नागरिक शंका व्यक्त करीत आहेत.
बॉक्स
थंड पाणी
अचलपूर नगरपालिका क्षेत्रात विनापरवाना थंड पाणी जारने पुरविणाऱ्या १२ आरओ प्लांट संचालकांना मुख्याधिकाऱ्यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये नोटीस बजावल्या. यात परतवाडा शहरातील पाच आणि अचलपूर शहरातील सात आरओ प्लांट संचालकांचा समावेश आहे. नोटीसनंतर तीन दिवसांत या सर्वांना सात ते आठ विभागांकडून नाहरकत प्रमाणपत्रासह आवश्यक दस्तावेज सादर करण्यास सुचविले होते. पण, यातील एकानेही तो दस्तावेज सादर केला नाही. यादरम्यान थंड पाणीपुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांनी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमधून कच्चे पाणी, पिण्यायोग्य पाणी यांची केमिकल, बॅक्टेरिऑलॉजिकल आणि हेवी मेटलबाबत वर्षातून किमान दोनवेळा चाचणी करून प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून निर्देश दिले गेले. पण, या अनुषंगानेही अजून त्या चाचण्या करण्यात आलेल्या नाहीत. तसे प्रमाणपत्र नगर परिषदेकडे सादर केले गेले नाही. काही ग्रामीण क्षेत्रातूनही अचलपूर-परतवाडा शहरात थंड पाणी जार वितरण केले जात आहे. ग्रामीण क्षेत्रातील आरओ प्लांट प्रशासनाकडून दुर्लक्षित आहेत.
कोट
थंड पाणी जारमधून पुरवठा करणाऱ्या आरओ प्लांट संचालकांकडून कुठलेही आवश्यक दस्तावेज, प्रमाणपत्र नगरपालिकेकडे सादर करण्यात आलेले नाहीत.
- मुन्शीराम पोटे, अभियंता, स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग, नगर परिषद, अचलूपर