अमरावती - माधुरी पोजगे खूनप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली व नंतर त्यांची जामिनावर सुटकासुद्धा झाली. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून मृताचा डीएनए अहवाल का प्राप्त झाला नाही, अहवाल प्राप्त व्हायला सात महिने लागतात का, असा सवाल करून या प्रकरणात आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय बळावल्याने हा अहवाल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथील मूळ रहिवासी माधुरी पोजगे ही ९ जुलै २०१७ रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर पोलीस तपासात माधुरीचा प्रेमप्रकरणातून पोलीस दलात कार्यरत अमित आकाशे व मोहित आकाशे यांनी खून केल्याचे स्पष्ट झाले होते. अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात नोकरी करणा-या मृतक माधुरीला प्रेमजाळ्यात अडकवून, नंतर लग्नास नकार देऊन तिचा आरोपींनी काटा काढल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. बेपत्ता मुलीचा शोध लागत नाही म्हणून पोजगे कुटुंबीयांनी आमदार यशोमती इाकूर यांच्यापुढे व्यथा मांडल्यानंतर, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी तत्कालीन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेऊन केली होती. यानंतर तपासाची गती आली व खुनाचा सुगावा लागला. माधुरीचा खुन करुन मृतदेह जाळण्यासोबतच राखेचीसुद्धा विल्हेवाट लावल्याचे दिसून आले.प्रेमसंबंधातून गर्भधारणा व नंतर विवाहाचा तकादा लावल्याने आरोपी अमित आकाशे व मोहित आकाशे यांनी हा खून करून पुरावे सुद्धा नष्ट केल्याचे सिद्ध झाले होते. आरोपींना अटक झाली व त्यांची जामिनावर सुटकासुद्धा झाली. मात्र, अद्यापही तिचा डीएनए अहवाल प्राप्त झाला नाही. त्यामुळे या प्रकरणात आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप तिचे वडील पुरुषोत्तम पोजगे यांनी केला.आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी परत एकदा आमदार यशोमती ठाकूर यांची भेट घेऊन केली. त्यामुळे हा अहवाल त्यांना उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मृत माधुरीचा ‘डीएनए’ अहवाल केव्हा? यशोमती ठाकूर यांची विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 7:35 PM