लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अचलपूर जिल्हा निर्मितीची मागणी गत तीन वर्षांपासून शासनदरबारी कागदावर फिरत आहे. लोकप्रतिनिधींच्या या महत्त्वपूर्ण मागणीकडे राज्य शासनाने दुर्लक्ष चालविले आहे. राज्य विधिमंडळाचे नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात अचलपूर जिल्हा निर्मितीबाबत आ. बच्चू कडू हे आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती आहे.राज्यात अचलपूरसह १७ जिल्ह्यांचा प्रस्ताव काँग्रेसच्या कार्यकाळातील आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने अवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीदेखील गठित केली. या समितीने शासनाला अहवालसुद्धा सादर केला. मात्र, तीन वर्षांपासून या अहवालावर विद्यमान शासनकर्ते ‘ब्र’देखील काढत नसल्याची ओरड आहे.अचलपूर जिल्हा निर्मितीमागील हेतू, विकासात्मक दृष्ट्या मागासलेपण, पायाभूत, मूलभूत सुविधांचा अभाव अशा कारणांचा अंतर्भाव करण्यात आला होता. मात्र, शासनकर्ते बदलताच अचलपूर जिल्हा निर्मितीचा विषय मागे पडल्याचे चित्र आहे. नव्या अचलपूर जिल्हा निर्मितीच्या प्रस्तावात चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव सूर्जी, धारणी, चिखलदरा या तालुक्यांचा समावेश नव्या जिल्ह्यात करण्यात आला आहे तसेच चुर्णी व आसेगाव या दोन तालुक्यांचादेखील प्रस्ताव राहणार आहे. माजी मंत्री वसुधा देशमुख त्यानंतर आ. बच्चू कडू, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनीही अचलपूर जिल्हा निर्मितीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. जिल्हा निर्मितीच्या अनुषंगाने अचलपुरात प्रशासकीय इमारतींसह आरोग्य, शिक्षण, सार्वत्रिक सुविधा अगोदरच उपलब्ध आहेत. परंतु, नवीन जिल्हा निर्मितीनंतर प्रशासकीय खर्चाचा बोजा वाढणार असल्याच्या भीतीने राज्य शासन या महत्त्वाच्या विषयांना बगल देत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.अद्यापही अचलपूर जिल्हा निर्मितीचा विषय वेटिंगवर असल्याचे वास्तव आहे. यापूर्वी आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा निर्मितीची घोषणा केली असली तरी लाखो नागरिकांच्या या स्वप्नाची पूर्तता कधी होणार, हे तूर्तास गुलदस्त्यात आहे.मुघल काळात अचलपूर होती राजधानीमुघल काळात अचलपूर हे राजधानीचे शहर होते. त्यावेळी एलिचपूर असे या शहराचे नाव होते. सीपी अँड बेरार प्रांत अस्तित्वात असतानादेखील अचलपूर जिल्हा होता. अचलपूर शहराला ऐतिहासिक, प्राचीन वारसा आहे. अचलपूर जिल्हा झाल्यास मेळघाटचे कुषोपण, बाल- माता मृत्यूवर नियंत्रण मिळविणे सुकर होईल. विदर्भातील काही मोजक्याच ‘अ’ वर्ग नगरपालिकांपैकी अचलपूर एक आहे. प्रशासकीय आणि तांत्रिकदृष्ट्या जिल्हा निर्मितीसाठी सर्वच सुविधा अचलपूरला प्राप्त आहेत. केवळ जिल्हा निर्मितीची शासनाकडून घोषणा होणे बाकी आहे.नवीन जिल्हा निर्मितीचे धोरण अद्यापही ठरले नाही. मात्र, धोरण ठरताच अचलपूरला प्राधान्य दिले जाईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. अचलपूर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाकडे सादर करण्यात आला आहे.- बच्चू कडूआमदार, अचलपूर
अचलपूर जिल्हा निर्मितीची स्वप्नपूर्ती केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 10:21 PM
अचलपूर जिल्हा निर्मितीची मागणी गत तीन वर्षांपासून शासनदरबारी कागदावर फिरत आहे. लोकप्रतिनिधींच्या या महत्त्वपूर्ण मागणीकडे राज्य शासनाने दुर्लक्ष चालविले आहे. राज्य विधिमंडळाचे नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात अचलपूर जिल्हा निर्मितीबाबत आ. बच्चू कडू हे आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देहिवाळी अधिवेशनात तापणार मुद्दा : फाईल तीन वर्षांपासून अडकली लालफीतशाहीत