अमरावती : मेळघाटातील वाहन चालक, शिपाई, वनमजूर, खानसामा आणि उद्यान माळी यांच्या २0 वर्षांंपासून बदल्या करण्यात आल्या नाहीत. यापैकी काही जण रूजू झाले तेव्हापासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे या कर्मचार्यांना न्याय कधी मिळणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी काही दिवसांपूर्वी वनपाल व वनरक्षकांच्या पारदर्शकतेने बदल्या करून न्याय देण्याची भूमिका बजावली. पहिल्यांदाच या बदली प्रक्रियेत उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी आदी कोणत्याही अधिकार्यांचा हस्तक्षेप न ठेवता थेट बदल्यांची प्रक्रिया राबवून मुख्य वनसंरक्षकांनी वनपाल, वनरक्षकांना न्याय दिला. मात्र वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी मेळघाटात कार्यरत वाहन चालक, शिपाई, वनमजूर, खानसामा आणि उद्यान माळी यांच्या बदल्याबाबत केव्हा निर्णय घेतला जाईल, या प्रतीक्षेत हे कर्मचारी आहेत. वन विभागात वरिष्ठपदी कार्यरत अधिकारी, कर्मचारी हे राजकीय दबाव किंवा वशिलेबाजी करून मर्जीच्या ठिकाणी बदली करून घेतात. मात्र तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्यांच्या बदल्या होत नसतील तर त्यांनी कोणाकडे दाद मागावी, हा प्रश्न निर्माण होत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कार्यरत हे कर्मचारी एकाच ठिकाणी सेवा देत सेवानवृत्तीच्या उंबरठय़ावर पोहचले आहेत. तरीदेखील या कर्मचार्यांच्या बदलीची फाईल फिरवली जात नाही, हे वास्तव पुढे आले आहे. धारणी, चिखलदरा या भागातील वाहन चालक, शिपाई, वनमजूर, खानसामा आणि उद्यान माळी, वाहन क्लिनर हे बदली केव्हा होणार या प्रतीक्षेत अनेक वर्षांंपासून आहेत. उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी या कर्मचार्यांच्या बदलीसंदर्भात वरिष्ठांकडे अद्यापर्यंंत कोणताही प्रस्ताव पाठविला नाही, अशी माहिती आहे. बदलीसंदर्भात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी आर्त हाक अन्यायग्रस्त कर्मचार्यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
मेळघाटातील वाहन चालक, शिपाई, वनमजुरांना न्याय केव्हा?
By admin | Published: June 02, 2014 12:54 AM