अमरावती : मानवी साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या गिधाड पक्ष्यांच्या संवर्धनाचा अॅक्शन प्लॅन राज्य शासनाकडे तयार नाही. एवढेच नव्हे तर राज्यात गिधाडांची संख्या किती हेदेखील निश्चित नाही. मात्र, शेजारील मध्यप्रदेश सरकारने प्रभावी उपाययोजना करून गिधाडांच्या संख्येत १२ टक्क्यांनी वाढ केली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, पेंच, नागपूर व सह्याद्रीच्या भागात गिधाडांचा संचार आढळतो. सजीवांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी निसर्गाने गिधाडाला स्वच्छदूत म्हणून जन्माला घातले आहे. मात्र, राज्यात काहीच भागात त्यांची संख्या शिल्लक असल्यामुळे ते भविष्यासाठी धोकादायक मानले जात आहे. गिधाड असलेल्या भागात त्यांच्यासाठी खाद्य उपलब्ध होत नसल्याने तेसुद्धा संख्या रोडावण्याचे कारण मानले जात आहे. मध्यंतरी गिधाडांसाठी रेस्टाँरट ही संकल्पना गडचिरोली, चंद्रपुरात राबविली गेली. त्यामुळे एकट्या गडचिरोलीत गिधाड २५० च्यावर असल्याची नोंद दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. मात्र, त्यानंतर रेस्टॉरेंट संकल्पनेला काहीअंशी छेद देण्याचा प्रकार झाला.सन १९८०-१९९० च्या दशकात राज्यात गिडाधांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. गिधाड पक्षी हे मेलेली गुरे-ढोरे खाऊन उपजिविका भागवितात. परंतु, काही वर्षांपासून मरणा-या गुराढोरांची संख्या कमी झाली आहे. मात्र, त्यानंतर गुरा, ढोºयांच्या संवर्धन, दूग्धव्यवसायासाठी सोडीयम डॉयक्लोफिनॅकचा वापर वाढला. त्यानंतर गुरा-ढोरांचे नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांचे दूषित मांस गिधाडाच्या खाण्यात आले. परिणामी, गिधाडांना किडनी आजाराने ग्रासले. दरम्यान, गुरा-ढोरांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले. त्यामुळे गिधाडांची संख्या कमी होत असल्याचे पक्षी अभ्यासकांचे मत आहे.
गिधाड ‘आययूसीएन’च्या लाल यादीत युनो प्रणीत आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना (आययूसीएन) ने गिधाडांचा होणारा ºहास बघता त्यांना सन २०१६ पासून लाल यादीत टाकले आहे. सन २०१८ च्या यादीतही गिधाड लाल यादीत आहे. वनविभागाने सामाजिक संघटना, पक्षी अभ्यासक, संवर्धकांच्या माध्यमातून गिधाडांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
पक्षी गणनेनंतरही गिधाडांची संख्या निश्चित नाहीशासन परिपत्रकानुसार दरवर्षी पक्षी गणना केली जाते. मात्र, ज्या भागात गिधाडांचे वास्तव आहे. त्याभागातदेखील गिधाडांची गणना होत किंवा नाही? हे स्पष्ट होऊ शकले नाही. वन्यजीव विभागाकडे गिधाडांच्या संख्येविषयी संभ्रम कायम आहे.
निसर्गाचे सफाई कर्मचारी म्हणून गिधाड काम करतात. घाण साफ करून ते सजीवांचे आरोग्य सुरक्षित ठेवतात. मात्र, गिधाडांच्या संवर्धनाचा अॅक्शन प्लॅन तयार नाही, ही दुर्देवी बाब आहे. शासनाने त्याकरिता पुढाकार घ्यावा.- यादव तरटे पाटील,पक्षी अभ्यासक, अमरावती