अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नव्या कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी अद्यापही समितीचे गठण झाले नाही.
विद्यमान कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ २ जून २०२१ पर्यंत असून, त्यापूर्वी नव्या कुुलगुरूंची निवड होणे अपेक्षित आहे. मात्र, राज्यपाल कार्यालयातून याबाबत कोणत्याही प्रकारच्या हालचाली सुरू नसल्याची माहिती आहे.
विद्यापीठात फेब्रुवारीत नवीन कुलगुरू निवड समितीचे सदस्यपदासाठी व्यवस्थापन परिषद, विद्वत परिषद यांची संयुक्त बैठक पार पडली. यात दिल्ली येथील बीएचयू आयआयटीचे संचालक संजीवकुमार जैन यांची सदस्य म्हणून निवड करून तसे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयात पाठविण्यात आले. मात्र, राज्यपाल नामित समितीचे अध्यक्ष, सचिवांची अद्यापही निवड झालेली नाही. कुलगुरू निवड समितीचे अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती अथवा उच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती असणे अपेक्षित आहे. सचिवपदी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांची निवड होत असते. परंतु, मार्च संपायला केवळ एक दिवस शिल्लक असताना अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू निवड समितीचे गठण झाले नाही. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ संपण्यासासाठी दोन महिने राहिले असून, नवीन कुलगुरूपदी कोणाची वर्णी लागते, याकडे नजरा लागल्या आहेत.
-------------------------
मुरलीधर चांदेकर यांना यूजीसीचे वेध
अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना विद्यापीठ अनुदान आयोगावर जाण्याचे वेध लागले आहे. केंद्र सरकारने यूजीसीत मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा निर्णय घेतला असून, नामविस्तारही होणार असल्याची माहिती आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांचे वरिष्ठ स्तरावरील सलोख्याचे संबंध बघता, त्यांची यूजीसीच्या उपाध्यक्षपदी वर्णी लागेल, अशी माहिती आहे.