अंजनगाव सुर्जी : खरीप हंगाम २०२०-२१ सोयाबीन व कपाशीचा पीक विमा मिळण्यासाठी अंजनगाव सुर्जी तालुका शेतकरी संघटनेच्यावतीने आज बुधवार, २ जून रोजी अंजनगाव सुर्जी तहसीलदार व कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
खरीप हंगाम २०२०-२१ या वर्षात तालुक्यात सोयाबीन व कपाशीचा पेरा ८० टक्के च्यावर असून विमा कंपनी कडून या दोन पिकांना विम्यातून वगळण्यात आले.शेतकऱ्यांनी सर्वच पिकांचा सरसकट विमा काढला. पण, कंपनीने ज्याचा पेरा कमी आहे त्या पिकाला विमा जाहीर केला. परंतु, सोयाबीन व कपाशी पिकांचा पेरा जास्त असून ह्याच पिकांचे नुकसान तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. कपाशीवर गुलाबी बोंडअळी, सोयाबीनवर खोडकिडा, येलो मोझॅक नावाचा नैसर्गिक रोग आल्यामुळे शेंगीत दाणे भरलेच नाही. परिणामी शेतकऱ्यांना सोयाबीन एकरी १०० ते १५० किलोच्या वर झाले नाही, तर उत्पादन खर्च ही निघाला नाही. म्हणून विमा कंपनीने संपूर्ण पीक विमा द्यायला पाहिजे होता. पण, तो अजूनपर्यंत मिळाला नाही, त्याला विम्यातून वगळण्यात आले.
म्हणून आज अंजनगाव सुर्जी तालुका शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदार अभिजित जगताप व कृषी अधिकारी मनोहर कोरे यांना निवेदन देण्यात आले. त्यांना ७ दिवसांच्या आत पीक विम्यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास पीक विमा कंपनी, केंद्र व राज्य सरकार तसेच अंजनगाव कृषी विभाग यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे गावागावात दहन करण्याचा इशारा अंजनगाव तालुका शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला. निवेदन देतेवेळी शेतकरी संघटनेचे प्रमुख माणिकराव मोरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव गावंडे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय भाऊ हाडोळे, ओमप्रकाश मुरतकर, गजानन पाटील दुधाट, किशोर पाटील काळमेघ तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.