पोलीस आयुक्तांना निवेदन : शिशुंच्या पालकांची न्यायासाठी भटकंतीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार नवजात शिशुंच्या मृत्यूप्रकरणात दोषी असणारे अधिष्ठाता दिलीप जाणे, पंकज बारब्दे व प्रतिभा काळे यांच्यावर कारवाई केव्हा होणार, असा प्रश्न पालकांनी पुन्हा केला आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांसह पालकांनी गुरुवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना निवेदनाद्वारे दोषींवर कारवाईची मागणी केली. रिपाइंकडून पोलिसांना तीन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. त्यामध्ये दोषी डॉक्टरांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा रिपाइंने पोलीस आयुक्तांना दिला आहे. डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात चार नवजात शिशुंचा चुकीच्या औषधोपचाराने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर पालकांचा रोष अनावर झाला होता. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी डॉ.भूषण कट्टा, परिचारिका विद्या थोरात व जामनिकला अटक केली. सद्यस्थितीत हे तिघे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांचा जामीन फेटाळण्यात आला आहे. ही कारवाई योग्य असली तरी, या प्रकरणात डीन डॉ. जाणे, बालरोग विभागप्रमुख डॉ.राजेंद्र निस्ताने, बारब्दे व काळे हेही जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून सहआरोपी करावे, अशी मागणी पालक माधुरी बंटी कावरे, शिल्पा दिनेश विरुळकर, पूजा आशिष घरडे यांनी केली आहे. याप्रकरणी शिशुंचे पालक राजकीय पक्षांसह प्रशासकीय अधिकारी व पोलीस प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांच्या मागणीवर अद्याप प्रशासनाने विचार केला नसल्याची ओरड आहे.पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपाइंचा लढाशिशूंच्या पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात पालकांनी रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांना निवेदन सादर केले आहे. गुरुवारी पोलीस आयुक्तांना निवेदन देताना जिल्हा संघटक अमोल इंगळे, मनोज वानखडे, मनोज थोरात, आतीष डोंगरे, प्रशांत वाकोडे, गौतम मोहोड यांच्यासह शिशूंच्या पालकांचा सहभाग होता. दोषी डॉक्टरांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन करू, त्याच्या परिणामाची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा रिपाइंकडून देण्यात आलेला आहे.
जाणे, निस्ताने, बारब्दे, काळेंवर कारवाई केव्हा ?
By admin | Published: June 23, 2017 12:13 AM