अमरावती : राज्य शासनाच्या आरोग्य सेवेतील एमडीएस उत्तीर्ण ‘पीजी’ डॉक्टरांची ऑगस्ट २०२२ पासून नियुक्ती रखडली आहे. शासन सेवेत असताना उच्च शिक्षण पूर्ण केले, पण ‘पीजी’ डॉक्टरांच्या या शिक्षणाचा गरीब, सामान्य रूग्णांना लाभ त्यांच्या नियुक्तीअभावी रखडला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘ब’ तब्बल १२०२ वैद्यकीय, प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदल्या, नियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचा कारभार कसा चालतो, हे दिसून येते.
राज्य शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगांवकर यांनी ९ जून २०२३ रोजी महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘ब’ चे वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांना नियमित बदल्या, नियुक्तीचे आदेश जारी केले आहे. शासकीय रूग्णालयात डेंटल चेअर नसल्याचे अफलातून कारण पुढे करीत ‘पीजी’ डॉक्टरांच्या नियुक्ती रोखण्यात आल्या आहेत. त्यामुळे शासन सेवेत असताना ‘पीजी’ शिक्षण घ्यावे की नाही? असा सवाल डॉक्टरांपुढे उभा ठाकला आहे.कळमेश्वर, नागपूर रूग्णालयात जागा रिक्तशासन सेवेतील तीन डॉक्टरांनी एडीएस ‘पीजी’ शिक्षण घेतले. यात नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील उपजिल्हा रूग्णालयाचे डाॅ. हेमराज बडे, अमरावती येथील सामान्य जिल्हा रूग्णालयाचे डॉ. अविनाश गव्हाळे व धारणी येथील उपजिल्हा रूग्णालयाचे डॉ. हुमायुन कुतुबुद्दीन मणेर यांचा समावेश आहे. कळमेश्वर ग्रामीण रूग्णालय आणि नागपूर येथील मनोरूग्णालयात जागा रिक्त असताना सुद्धा नियुक्ती दिली जात नाही.