अमरावती: कुणाची एसटी बसमध्ये चढण्याची तर कुणाची आतमध्ये शिरल्यावर जागा पटकाविण्याची धडपड. तर शेकडो जण एसटी बसची प्रतिक्षा करत फलाटावर उभे. काही कळण्याच्या आत दोन दहशतवादी एका प्रवासी बसमध्ये शिरतात. तेथे बंदुकीच्या धाकावर प्रवाशांना ओलीस धरतात. अन् लागलीच पोलीस कुमक पोहोचल्याने धरपकड सुरू होते. शेकडो प्रवाशांच्या देखत त्या दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या जातात. जीव मुठीत धरून उभे असलेल्या प्रवाशांचा जीवाचा थरकाप उडतो. मात्र काही क्षणानंतर ते खरे दहशतवादी नसून ते पोलिसांचे माॅकड्रिल असल्याचे लक्षात येते अन् प्रत्येकजण सुटकेचा निश्वास सोडतो.
येथील मध्यवर्ती बस स्थानक येथे दहशतवाद विरोधी शाखा, जलद प्रतिसाद पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक यांच्या संयुक्त पथकासह १० ऑगस्ट रोजी मॉक ड्रिल ‘रंगीत तालीम’ घेण्यात आली. तेथील बसमध्ये दोन दहशतवादयांनी एसटी विभागातील चार कर्मचा-यांना बंधक केल्याचे भासवून क्युआरटी पथकाच्या प्रशिक्षित कमांडोंनी त्या बंधकांची सुटका केल्याचे दाखविण्यात आले.
पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ती रंगित तालिम घेण्यात आली.
यांनी घेतला सहभाग
मॉकड्रिलवेळी विशेष शाखा येथील पोलीस निरिक्षक बाबाराव अवचार, दहशतवाद विरोधी पथक, अकोला युनिटचे सहायक पोलीस निरिक्षक प्रेमानंद कात्रे, दहशतवाद विरोधी शाखेतील सहायक पोलीस निरिक्षक योगेश इंगळे, क्युआरटीचे पोलीस उपनिरिक्षक विनोद चव्हाण, प्रणीत पाटील व १७ कमांडो, तसेच कोतवाली एटीसीतील उपनिरिक्षक राखी झाकर्डे, बिडीडीएसच्या पोलीस निरिक्षक सोनाली गुल्हाणे यांच्यासह चार अंमलदार व प्रिंस श्वान सहभागी झाले.