गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांना दर १० मिनिटांनी हवामानाची अचूक माहिती मिळावी, यासाठी विभागात पाच जिल्ह्यांतील ३७७ महसूल मंडळासह विदर्भात ८२८ तर राज्यातील दोन हजार ६५ महसूल मंडळात स्वंयचलित हवामान केंद्रे सात महिन्यांपूर्वी कार्यान्वित करण्यात आली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनाअभावी यंत्रणा रखडल्याने अद्याप एकाही केंद्रावरून शेतकऱ्यांना हवामान माहितीचा सल्ला व ‘एसएमएस’ पाठविण्यात आलेला नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना कायम नैसगीक आपत्तीचा सामना करावा लागतो. यामध्ये पिकांची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल २०१७ मध्ये हवामानाच्या अचूक माहितीचा वेध घेण्यासाठी ‘स्कॉयमेट वेदर सर्व्हिसेसच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलीत हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. या केंद्रांमुळे शेतकऱ्यांना पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामान घटकासह १२ किमी परिघातील हवामानाची अचूक माहिती दर १० मिनिटांनी ‘एसएमएस’द्वारे मिळणार आहे. यासंदर्भात संबंधित कंपनीसोबत कृषी विभागाचा सात वर्षांसाठी करारदेखील झाला. केवळ जागेव्यतिरिक्त शासनाची कोणतीही आर्थिक गुंतवणूक या प्रकल्पात नाही, कृषी विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव विजयकुमार यांच्या पुढाकारामुळे शासनाची किमान १५० कोटींची बचत झाली. राज्यातील पहिले स्वयंचलित हवामान केंद्र नागपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३० एप्रिल २०१७ ला उद्घाटित झाले. त्यानंतर सर्वच महसूल मंडळात ही केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. यामधून डाटा पुण्याच्या सर्व्हरला पाठविण्यात येत आहे. मात्र, राज्य प्रकल्पाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांच्या तारखेचा मुहूर्त न गवसल्याने योजना कितीही महत्त्वाची असली तरी अंमलबजावणी सहा महिन्यांपासून झालेली नाही.सर्वाधिक केंद्रे यवतमाळ जिल्ह्यातया महावेध प्रकल्यांतर्गत अमरावती विभागात ३७७ केंद्रे राज्यात उभारण्यात आली. यामध्ये सर्वाधिक १०१ केंद्रे यवतमाळ जिल्ह्यात आहेत. याव्यातिरिक्त अमरावती जिल्ह्यात ८९, अकोला ५१, वाशिम ४६, व बुलडाणा जिल्ह्यात ९० केंद्रे कार्र्यान्वित करण्यात आलीत. व्यतिरिक्त दुर्गम व डोंगराळ भागातही केंद्रे सुरू करण्यात आली असली तरी माहिती शेतकऱ्यांना मिळत नसल्याने कुचकामी ठरली आहेत.राज्यभरातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना लॉगइन आयडी व पासवर्ड दिला आहे. त्यांना हवामानाची माहिती पाहता येते. लवकरच शेतकऱ्यांना हवामानाचा सल्लाचा एसएमएस पाठविला जाईल. सध्या अपडटेशनचे काम सुरू आहे.- भूषण रेनके,विदर्भ व्यवस्थापक, महावेध प्रकल्प
हवामानाचा वेध केव्हा?: महावेध प्रकल्पाला उद्धाटनाचा मुहूर्त गवसेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:10 PM
विदर्भात ८२८ तर राज्यातील दोन हजार ६५ महसूल मंडळात स्वंयचलित हवामान केंद्रे सात महिन्यांपूर्वी कार्यान्वित करण्यात आली. मात्र, अद्याप एकाही केंद्रावरून शेतकऱ्यांना हवामान माहितीचा सल्ला व ‘एसएमएस’ पाठविण्यात आलेला नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
ठळक मुद्देना कृषी सल्ला, ना एसएमएस३७७ हवामान केंद्रे कुचकामी