गतवर्षीच्या लॉकडाऊनपासून बडनेरा रेल्वे स्थानकावरील सर्वच प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. केवळ नवी वस्तीच्या बाजूने असणाऱ्या तिकीटघरापासून एकमेव प्रवेशद्वार प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी सुरू ठेवण्यात आले आहे. या वर्षात बऱ्याच रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या सध्या ६५ प्रवासी गाड्या बडनेरा रेल्वे स्थानकावरून इतरत्र धावत आहेत. प्रवाशांची संख्यादेखील बरीच वाढली आहे. प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी दोन पादचारी पूल तयार करण्यात आले आहेत. नव्याने उभारण्यात आलेला पादचारी पूल गेल्या दीड वर्षांपासून बंदच आहे. त्यामुळे एकाच पादचारी पुलावरून प्रवाशांची ये-जा सुरू आहे. काही गाड्यांवर अलीकडे प्रवाशांची मोठी गर्दी होते आहे. तेव्हा एकाच पादचारी पुलावर गर्दी होत आहे. त्याच प्रमाणे जुन्या वस्तीच्या बाजूने प्रवेशद्वार बंद करण्यात आले. वाढती गाड्यांची व प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेऊन बंद असणारे सर्वच प्रवेशद्वार सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार जिल्हा प्रशासनाकडे करावा, अशी मागणी बडनेरा शहरवासीयांसह प्रवासी वर्गामधून पुढे येत आहे. प्लॅटफॉर्मकडे जाणारे सर्वच प्रवेशद्वार सुरू केल्यास एकाच पादचारी पुलावर गर्दी होणार नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाला धरून ठरवून दिलेल्या नियमावलीचेदेखील पालन होईल. स्वयंचलित जिना बंद आहे. तोदेखील सुरू झाला पाहिजे. कोरोनाकाळात रेल्वे प्लॅटफॉर्मवर तसेच परिसरात गर्दी होऊ नये व संसर्ग वाढू नये, यासाठी सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते.
बडनेरा रेल्वे स्थानकाचे बंद प्रवेशद्वार केव्हा उघडणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:10 AM