- मोहन राऊत धामणगाव रेल्वे (अमरावती) : तीन जिल्ह्यांचे केंद्रबिंदू, इंग्रजाच्या काळातील महत्त्वाची बाजारपेठ असलेले धामणगाव रेल्वे स्थानक आजही अनेक सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या थांब्यापासून वंचित असून, हे यवतमाळ जिल्ह्याचे संलग्नित स्टेशन कधी होणार, असा सवाल दोन जिल्ह्यांतील प्रवाशांनी उपस्थित केला आहे.मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांचा २० डिसेंबर रोजी धामणगावात निरीक्षण दौरा आहे. सुमारे ४० कोटी रुपये खर्च करून कोलकत्ता मुंबई रेल्वे महामार्गावरील धामणगाव रेल्वे स्थानक ‘मॉडेल रेल्वे स्थानक’ बनविण्याचा चंग बांधण्यात आला. मात्र, त्या कामाला गती नव्हती. तथापि, महाव्यवस्थापकांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशद्वार उभारण्यात आले. स्थानकाच्या सौंदर्यीकरणाची कामे गतीने करण्यात आली. रेल्वे स्थानक परिसरात वृक्षारोपण केले गेले. मालधक्का परिसराचे डांबरीकरण करण्यात आले. रेल्वे विभाग एकट्या महा व्यवस्थापकांच्या दौ-याानिमित्त लाखो रुपये खर्च करीत असले तरी पर्यायी काहीअंशी सुविधा होणे शिल्लक आहे.इंग्रजांच्या काळापासून या स्थानकाची नोंद मध्य रेल्वे प्रशासनात आहे. यवतमाळहून मुंबईला जाण्यासाठी हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. दररोज यवतमाळ जिल्ह्यातील प्रवासी मुबंई व इतर ठिकाणी जाण्यासाठी धामणगाव रेल्वे स्थानकावर येतात. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर व बडनेरा रेल्वे स्थानकावर अनेक सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा थांबा आहे. मात्र धामणगाव हे यवतमाळ जिल्ह्याचे संलग्न स्थानक असताना सुपरफास्ट गाड्यांचा थांबा नाही. महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी धामणगाव रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट रेल्वे गाड्यांच्या थांबा देऊन यवतमाळ व अमरावती या दोन्ही जिल्ह्यांतील प्रवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
या गाड्यांना हवा थांबाआझाद हिंद एक्स्प्रेस, बिकानेर-सिकंदराबद एक्स्प्रेस, जोधपूर एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, ओखा-पुरी एक्स्प्रेस, नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस या गाड्यांचा थांबा धामणगाव रेल्वे स्थानकावर महत्त्वाचा आहे. धामणगाव रेल्वे स्थानकाची लांबी एक किलोमीटर आहे. चांदूर रेल्वे दिशेने एक पुल तसेच मालधक्याजवळ उत्तर भागात रेल्वे तिकीट घराची निर्मिती करणे गरजेचे आहे.
असा राहणार महाव्यवस्थापकांचा दौरामुंबई मुख्यालयातून १२ डब्याच्या विशेष रेल्वेने संजीव मित्तल महाव्यवस्थापक मध्य रेल्वे मुंबई येथून मध्य रेल्वेतील विविध ठिकाणच्या निरीक्षणाकरिता निघाले आहेत. दरम्यान शुक्रवारी सकाळी ९ वाजता ते ४०० हून अधिक अधिकाºयांसह धामणगाव रेल्वे स्थानकावर भेट देणार आहेत. गुड्स शेड, दक्षिणेकडील भागातील प्रवेश द्वाराचे निरीक्षण, सेव्ह वॉटर, वातानुकूलित प्रतीक्षालयाचे नूतनीकरण, अप प्लॅटफॉर्मवर नवनिर्मित लिफ्टचे लोकार्पण केले जाणार आहे.
धामणगाव रेल्वे स्थानक हे इंग्रजाच्या काळापासून अस्तित्वात आहे. यवतमाळ जिल्ह्याला संलग्न आहे. मलकापूर रेल्वे स्थानकावर ज्या सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा थांबा आहे. त्या सर्व गाड्यांचा थांबा धामणगाव रेल्वे स्थानकावर द्यावा.- अशोक भंसाली, सदस्य, रेल्वे प्रवासी संघ