अमरावती : कोरोना संसर्गामुळे यंदा दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, परीक्षा रद्द झाल्याने परीक्षा शुल्क परत मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील ४०६६३ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळण्याचे वेध लागले आहेत.
गतवर्षी मार्चपासून कोरोनाचे आगमन झाले. कोरोनामुळे शिक्षणक्षेत्र प्रभावित झाले असून, पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अगाेदरच झाला आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा वेग लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानेदेखील दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या ६६५ शाळा आहेत. दहावीची परीक्षा रद्द झाल्याने सरसकट ४०६६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ४१५ याप्रमाणे १ कोटी ६८ लाख ७५ हजार १४५ रुपये परीक्षा शु्ल्क भरले आहे. परीक्षाच रद्द झाल्याने शुल्क परत केव्हा मिळणार, असा सवाल विद्यार्थ्यांसह पालकांनी उपस्थित केला आहे.
----------------------
दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत देण्याबाबत नवीन गाईड लाईन काहीही नाहीत. शासनाकडून तशा काही सूचना आल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- तेजराव काळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), अमरावती.
--------------------
कोरोनामुळे दहावीच्या शाळा महिनाभरच झाल्या. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने शिकवणी झाली. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने शुल्क परत मिळेल की नाही, याबाबत संभ्रम आहे. शुल्क परत मिळणे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे.
- अल्पेश वानखडे, विद्यार्थी.
-------------
कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राला माेठा फटका बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. त्यामुळे परीक्षा शुल्क परत मिळणे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे. आतापर्यंत परीक्षा शु्ल्क परत मिळायला हवे होते.
- नंदीनी मराठे, विद्यार्थिनी
------------------
जिल्ह्यातील एकूण शाळा व विद्यार्थी संख्या
दहावीतील एकूण विद्यार्थी - ४०६६३
प्रति विद्यार्थी परीक्षा शुल्क - ४१५
एकूण परीक्षा शुल्काची रक्कम - १६८७५१४५
जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा - ६६५