चुरणी : विकेंद्रित खरेदी योजनेंतर्गत गहू खरेदी करण्याचा आदेश असताना देखील महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने २२ एप्रिल उलटूनही शेतकऱ्यांच्या मालाची ऑनलाईन नोंदणी केलेली नाही. १९ ते ३० एप्रिल कालावधीत वेब पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्याची कार्यवाही करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांनी दिलेले बँक खाते क्रमांक सुरू असल्याची खात्री करून घावी, अशा आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना होत्या.
ऑनलाईन नोंदणी व खरेदी सुरू न झाल्याने अर्ध्यापेक्षा अधिक गहू व्यापाऱ्यांच्या घशात गेला आहे. काही शेतकऱ्यांचा माल घरातच पडून असून ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख ३० एप्रिल असताना आदिवासी विकास महामंडळातील अधिकारी गप्प का, असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत. धारणी प्रादेशिक कार्यालयात विचारणा केली असता त्यांनी गहू खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी सुरू असल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात नोंदणी देखील सुरू झालेली नाही.