पाच गावे उपेक्षित
पान १ वर
गतवर्षी उघडली बगाजी सागर धरणाची १३ दारे, अप्पर वर्धाचे अतिरिक्त पाण्याने शेतकऱ्यांचे हाल
धामणगाव रेल्वे : गतवर्षी जुलै महिन्यात बगाजी सागर धरणाचे १३ दरवाजे उघडल्याने वर्धा नदीला आलेल्या महापुरामुळे पाच गावांतील तब्बल अडीचशे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या होत्या. मात्र, अद्यापही मदतीचा आधार न मिळाल्याने या शेतकऱ्यांचा आक्रोश कायम आहे.
गतवर्षी अधिक पाऊस झाल्याने अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. येथील पाण्याचा प्रवाह बगाजी सागर धरणात आल्याने या धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले. गतवर्षी जुलै महिन्यात एकीकडे वर्धा नदीला आलेला महापूर, तर दुसरीकडे बगाजी सागर धरणाचे दरवाजे उघडल्याने वर्धा नदीच्या पात्रालगत असलेल्या नायगाव, दिघी महल्ले, बोरगाव निस्ताने, सोनोरा काकडे, आष्टा, चिंचोली या परिसरातील तब्बल २५० शेतकऱ्यांची शेतजमीन जमीन खरडून गेली होती, तर पिके पूर्णत: वाहून गेली. एकट्या नायगाव येथील सर्वाधिक ४८ शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले होते. महसूल प्रशासनाने त्यावेळी सर्वेक्षण केले जिल्हा प्रशासनाला ही यादी पाठवण्यात आली होती. मात्र, या शेतकऱ्यांना एक रुपया अद्यापही मदत मिळाली नाही.
दहा वर्षांपासून शेतकऱ्यांचा नशिबाला दोष
मागील आठ-दहा वर्षांपासून दरवर्षी नदीपात्रालगत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पुरामुळे नुकसान होते. परंतु, तालुका व जिल्हा प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिकच डबघाईस येत आहे. दरवर्षी उसनवारी, व्याजाने पैसे घेऊन पेरणी केल्यानंतर बगाजी सागर धरणाचे पाणी सोडले जाते. त्यात वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे हे पीक नष्ट होते. अनेक वेळा तालुका व जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले, आता न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांना पडला आहे. दहा वर्षांपासून या भागातील शेतकरी नशिबाला दोष देत शेती करीत आहेत.
--------------
गतवर्षी उसनवारी घेऊन शेतीची पेरणी केली. मात्र, जुलैमध्ये बगाजी सागरचे दरवाजे उघडले. त्यात वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण शेतच खरडून गेले. शासन व प्रशासनाने आमच्या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे.
- राजेंद्र शेलार, नायगाव