पथ्रोट : सन २०१९ च्या जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे अचलपूर तालुक्यातील संत्रा बागायतदाराचे लाखोंच्या घरात नुकसान झाले होते. २०२१ आता एक महिन्यावर येऊन ठेवला असतानाही नुकसानभरपाईला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. तरी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई अद्याप जमा झालेली नाही. शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच आहे.
संत्राफळांच्या नुकसानाच्या अनुदानाची घोषणाही राज्यपालघोषित असल्याकारणाने शासनाने बागायतदारांना हेक्टरी १८ हजार रुपये मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत नुकसानभरपाई जाहीर केली होती. त्याअनुषंगाने शासनाने महसूल व कृषी विभागातर्फे तातडीने अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते. शासनाच्या आदेशाप्रमाणे संबंधित विभागाकडून नुकसानाची पाहणी करून बाधित क्षेत्राचा अहवाल पाठविण्यात आला.
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पथ्रोट साझ्यातील कुंभी वाघोली येथे २०३.६४, कासमपूर येथे १०३.६०, जहानपूर येथे ४०.३०, धरमपूर येथे ८९.७७, पथ्रोट भाग १ मधील येथे १३७.७०, रामापूर खु. येथे ३३.८९, रामापूर बु. येथे ५६.६८ असे एकूण ६६५.८ हेक्टर तसेच पथ्रोट भाग २ येथे ४२८.५२, जवळापूर येथे १२ हेक्टर याप्रमाणे नुकसानाचा अहवाल पाठविला. पथ्रोट भाग १ साझ्याची एकूण नुकसान आकडेवारी १ कोटी २० लाख रुपये, तर पथ्रोट भाग २ साझ्याची ८१ लाख ९३६० रुपये पाठविण्यात आली.
२०१९ मध्येच झालेल्या संत्रा नुकसानासोबत पथ्रोट परिसरातील मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांचेसुद्धा नुकसान झाले होते. त्या पिकांना शासनाने हेक्टरी आठ हजार रुपये दोन हेक्टरपर्यंत अनुदान जाहीर केले होते. त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानाची रक्कम जमा झाली. मात्र, संत्राउत्पादक शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम कुठे अडकली, राज्यपालांनी घोषित केलेल्या अनुदानाची रक्कम शासन केव्हा पाठविणार, याबबत शासनाचे धोरण उदासीन का, असा सवाल बाधीत शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
कोट
निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांचा कैवार घेणारे निवडून आल्यावर वाऱ्यावर
सोडतात. हा अनुभव आतादेखील आला आहे. - जयंत गुणवंतराव हरणे, शेतकरी पथ्रोट
कोट
संत्र्याच्या नुकसानाला दोन वर्षे पूर्ण होत असतानाही अनुदानाची रक्कम खात्यात जमा झालेली नाही. नेतेमंडळी आश्वासनांची खैरात वाटून मोकळे होतात, हे वास्तव आहे.- अमेन्द्र प्रभूसिंग वर्मा, शेतकरी, पथ्रोट