अमरावती : मे महिन्यात वन्यजीव पाण्याच्या शोधात वनक्षेत्राबाहेर पडत आहेत. मात्र, वनक्षेत्रालगतच्या बहुतांश विहिरींवर संरक्षण जाळी बसविण्यात आली नसल्याने या विहिरीत पडून वन्यजीवांचे अपघाती मृत्यू होत आहेत. अशाप्रकारच्या घटना राज्याच्या कानाकोपऱ्यात नियमितपणे घडत आहे. त्यामुळे वनक्षेत्रालगतच्या विहिरींवर संरक्षण जाळी बसवून वनविभागाने वन्यजीवांचे अपघाती मृत्यू थांबवावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
येथील वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च ॲन्ड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नीलेश कंचनपुरे यांनी शासनाला पाठविलेल्या निवेदनातून वन्यजीवांचे अपघाती मृत्यूची कारणमीमांसा स्पष्ट केली आहे. हल्ली वनक्षेत्रात नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर पाणी मिळत नाही. त्यामुळे वाघ, बिबट, हरिण, नीलगाय, जंगली डुक्कर आदी वन्यजीव तृष्णातृप्तीसाठी भटकंती करतात. दरम्यान विहिरीत पाणी दिसून येताच वन्यजीव ते पिण्यासाठी विहिरीत उड्या मारतात. मात्र, विहिरीतून बाहेर निघणे कठीण होते. त्यामुळे आतापर्यंत विहिरीत बुडून अनेक वन्यजीवांचे अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनांची नोंद वन विभागाकडे आहे. त्यामुळे वनविभागाने वनक्षेत्रालगतच्या विहिरींवर संरक्षण जाळी बसविल्यास वन्यजीवांचे अपघाती मृत्यू रोखता येईल, अशी आर्त हाक नीलेश कंचनपुरे दिली. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. साईप्रसाद, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकाेडकर, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण आदींकडे निवेदन सादर करण्यात आले. विदर्भातील वनक्षेत्रालगतच्या विहिरींमध्ये वन्यजीवांचे अपघाती मृत्यू झाले आहेत.