लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : अमरावती जिल्ह्यात मध्य प्रदेशातून रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने रेतीघाट लिलावावर परिणाम जाणवत आहे. परराज्यातून येणारी रेती वाहतूक आणि साठवणुकीवर प्रतिबंध लावण्याकरिता अप्पर जिल्हाधिकारी अमरावती यांनी ३० नोव्हेंबर रोजी आदेश काढून १ डिसेंबरपासून त्रिसदस्यीय चेकपोस्ट स्थापन करण्यासंदर्भात आदेश दिले. परंतु, चेकपोस्ट कुठेही स्थापन केलेले नसल्याने वरूड तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मध्यप्रदेशातून रेती तस्करी सुरू आहे. ती रोखण्यासाठी पथके तयार केल्याचे तहसीलदार सांगतात. मध्यप्रदेशातून अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी करून रेतीची वाहतूक आणि साठेबाजी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळे वरूड तालुक्यासह जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव झालेच नाहीत. उलट या रेतीघाटातील रेतीसुद्धा चोरीला जात असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या प्रकाराला आळा घालण्याकरिता मध्य प्रदेशातील रेती वाहतूक तसेच साठवणुकीस प्रतिबंध घालण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात १६ नोव्हेंबर रोजी बैठक पार पडली. मध्यप्रदेशातील रेती वाहतुकीवर प्रतिबंध घालण्याच्या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी ३० नोव्हेंबरला आदेश काढून धारणी, अचलपूर, चांदूर बाजार, वरूड, मोर्शी आणि तिवसा तालुक्यातील सीमेवर चेकपोस्ट स्थापन करण्यात येऊन पथकप्रमुख म्हणून नायब तहसीलदारांना नेमण्याचे तसेच यामध्ये महसूल, पोलीस आणि परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्याचे आदेश आहेत. तालुक्यामध्ये सीमावर्ती भागातील चेकपोस्टवरच तपासणी मोहीम राबवून यामध्ये साप्ताहिक अहवाल दर शुक्रवारी तहसीलदारांनी उपविभागीय अधिकारी यांना सादर करावा, असेही आदेश आहेत. इतर राज्यासह मध्यप्रदेशातून येणाऱ्या रेती, वाळू साठवणुकीच्या जागेवर जागामालक आणि ट्रकमालक यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८ मधील पोटकलम ८(१)व ८(२) नुसार यथोचित कारवाई पोलीस व परिवहन विभागास कळविण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत.
एसडीपीओ उतरले रस्त्यावर१ डिसेंबर रोजी निघालेल्या आदेशावर वरूड तालुक्यात कोणतीही कारवाई झाली नसल्याने अखेर उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी बुधवारी पहाटे गस्त घालून ओव्हरलोड रेतीचे चार टिप्पर जप्त केले. यामुळे रेती तस्करांमध्ये खळबळ माजली आहे.