भाकपचा जिल्हा मेळावा: नामदेवराव गावडे यांचा सवालअमरावती : जागतिक पातळीवर कच्चा तेलाच्या किमतीत कमालीची घसरण झाली असून शेजारी असलेल्या पाकिस्तानात प्रतिलिटर पेट्रोल १५ रुपयांनी स्वत: झाले. मात्र भारतात केवळ दोन रुपयांनी पेट्रोलच्या भावात कपात करुन मोदी शासनाने देशवासीयांची थट्टा चालविल्याचा आरोप करीत भाजपचे अच्छे दिन कुठे आहे? असा सवाल भाकपचे प्रदेश सचिव तथा किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नामदेवराव गावडे यांनी येथे गुरुवारी उपस्थित केला.येथील अग्रसेन भवनात आयोजित भाकपच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पी. के. उके तर उद्घाटन तुकाराम भस्मे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शरदराव सुरजुसे, जी. एम. कोठारी, नारायणराव भगवे, सुनील घटाळे, नामदेवराव बदरके, अशोक सोनारकर, उषा घटाळे, बी.के. जाधव आदी उपस्थित होते. पुढे बोलताना नामदेवराव गावडे यांनी केंद्रातील मोदी शासनावर तोफ डागली. देशवासीयांना अच्छे दिन येणार, असे दीवास्वप्न दाखविले. मात्र आता मोदींनी शब्द फिरवायला सुरुवात केल्याचा आरोप त्यांनी केला. देशात १०० स्मार्ट सिटी बनविण्याचे तुणतुणे वाजवणे म्हणजे अकार्यक्षमतेचे लक्षण होय, असे ते म्हणाले. स्मार्ट सिटी निर्माण करण्याच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळाकावली जात आहेत. त्याकरिता भूसंपादनाचा नवा कायदा आणला असून याला अमेरिकेचे संबंध कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्तेत येताच विदेशातील काळा पैसा परत आणू, असे म्हणणाऱ्या मोदींचे आता मौन का? असे गावडे म्हणाले. शेतकरी आत्महत्या करीत असताना बळीराजा जगविण्यासाठी शासन काहीच उपाययोजना करीत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. मोदींनी दिलेला शब्द पाळून विदेशातील काळा पैसा आणून देशवासींना न्याय प्रदान करावा, असे ते म्हणाले. देशात अनेक प्रश्न, समस्या कायम असताना मोदी हे परदेशातच जास्त वेळ राहत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मोदी शासनावर ताशेरे ओढत हे शासन गोरगरीबांसाठी घातक असल्याचा आरोप केला. दरम्यान तुळसाबाई चंदेल, वेणूताई आवारे, मंदाकिनी राऊत या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
मोदी शासनाचे ‘अच्छे दिन’ आहेत कुठे?
By admin | Published: February 05, 2015 11:01 PM