वरूड : तालुक्यातील शिंगोरी येथे बेनोडा पोलिसांनी ११ फेब्रुवारीला मध्यरात्री धाडसत्र राबवून एका घरातून देशी दारूच्या २४ पेट्या आणि ७० बॉटल देशी दारू जप्त केली. तीन आरोपींना अटक केली. मात्र, त्या अवैध विक्रेत्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात देशी दारू कोठून आली, हा मुद्देमाल पुरविणारा परवानाधारक दारूविक्रेता कोण, हे अद्याप अनुत्तरित आहे.
पोलिसांनी माहिती पाठवूनही त्या दुकानदारांवर कारवाई झाली नसल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाची भूमिका संशयास्पद ठरली आहे. शिंगोरी येथील श्रीराव आणि कुरवाडे यांच्या घरातून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यानंतर बेनोडाचे ठाणेदार मिलिंद सरकटे यांनी तपास करून सदर दारूच्या बॉटलवरील बॅच क्रमांकावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र पाठविले. मात्र दारू कुणाची, याबाबत पोलिसांना माहिती अप्राप्त आहे. शिंगोरीवासीयांनी गावात दारूबंदी व्हावी, यासाठी १८ ऑगस्ट २०१८ रोजी ठरावसुद्धा घेतला. परंतु, दारूविक्री सुरूच होती. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
कोट
जप्त दारू बॉटलवरील बॅच क्रमांकाबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती मागविली. परंतु, अद्याप ती दारू नेमकी कोणत्या दुकानातील, हे कळू शकले नाही.
- मिलिंद सरकटे, ठाणेदार, बेनोडा
----