अमरावती : जिल्हा परिषदेच्या व मान्यताप्राप्त शाळांची एकीकृत माहिती मिळावी, या उद्देशाने केंद्राने यृू-डायसच्या माध्यमातून ही माहिती संगणकीकृत करण्याची प्रक्रिया सुरू असून राज्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३ लाख विद्यार्थी कमी नोंदले गेले आहेत. यात अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत सुमारे ४९ हजार ८१२ विद्यार्थ्यांची तफावत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
जिल्हा परिषद व मान्यताप्राप्त शाळांची एकीकृत माहिती मिळावी, या उद्देशाने केंद्राने यू-डायसच्या माध्यमातून ही माहिती संगणकीकृत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यासह विभागात गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्हा परिषद शाळांतील सुमारे ४९ हजार ८१२ विद्यार्थी कमी नोंदले गेले आहेत. यामध्ये अमरावती ६७००, यवतमाळ १६८२८, बुलडाणा ११ हजार, अकोला ७८४८, वाशिम ७४०० विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. दरम्यान ही तफावत दूर करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाला महिनाभरापूर्वी पत्र पाठवले, परंतु, ही तफावत दूर झालेली नाही. हे विद्यार्थी गेले कुठे, असा प्रश्न आहे. याचा अंदाजपत्रकावर परिणाम होऊ शकतो. समग्र शिक्षा अभियान कार्यालयाने जिल्हा परिषदांना पत्र पाठवून त्यांच्या जिल्ह्यांतील शाळांना तातडीने विद्यार्थी नोंदणीच्या सूचना दिल्या आहेत.
विद्यार्थिसंख्येनुसार मिळतो निधी
राज्यात विद्यार्थिसंख्येनुसार शाळांना निधी दिला जातो. त्यानुसार दरवर्षी शाळांनी विद्यार्थ्यांचा डाटा यू-डायस प्रणालीवर ऑनलाइन भरणे आवश्यक आहे. याशिवाय केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणीदेखील या विद्यार्थिसंख्येनुसारच केली जाते. यात प्रामुख्याने गणवेश वाटप, मोफत पाठ्यपुस्तके वाटप तसेच पोषण आहाराचा समावेश आहे.
वेबसाइट चालत नसल्याचे कारण
समग्र शिक्षा अभियान कक्षानुसार अनेक शाळांमधून ऑनलाइन नोंदणीसाठी वेबसाइट चालत नसल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे आता शाळानिहाय पत्र देऊन नोंदणी करण्यासाठी मुदत दिली जाईल.
युडायस प्लस २०२१-२२ व २०२२-२३ च्या ऑनलाइन प्रणालीमध्ये नोंदविलेल्या विद्यार्थ्यांची तफावत आहे. त्यामुळे संबंधित शाळेवर प्रत्यक्ष जाऊन ही तफावत का आहे, याची कारणे शोधावी व याबाबतचा अभिप्राय मागविला आहे. याबाबत सर्व गटशिक्षणाधिकारी यांना लेखी सूचना दिलेल्या आहेत. त्याच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल.
- बुद्धभूषण सोनोने, प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक)