अमरावती : शहरातील हॉटेल, प्रतिष्ठान, संकुलातील गायब करण्यात आलेल्या वाहनतळाची शोधमोहीम महापालिका प्रशासनाने सुरु केली आहे. मंगळवारी १० प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली असून वाहनतळांप्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.आयुक्त अरुण डोंगरे यांच्या आदेशानुसार संकुलातील वाहनतळांची शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिका सहायक संचालक नगररचना विभागातील नोंदीनुसार ७० व्यावसायिक प्रतिष्ठानांची तपासणी करण्याचे ठरविले आहे. पहिल्या टप्प्यात १० प्रतिष्ठानांची तपासणी पूर्ण करुन वाहनतळ कोठे आहेत? याची चाचपणी करण्यात आली आहे. ज्या प्रतिष्ठानांचे वाहनतळ बेपत्ता झाले त्यांना मंजूर नकाशाप्रमाणे वाहनतळ सुरु करण्याचे निर्देश नोटीसद्वारे बजावण्यात आले आहेत. बहुतांश हॉटेल, प्रतिष्ठानच्या संचालकांनी परवानगी मिळविताना नकाशात वाहनतळ दर्शविले होते. मात्र, कालांतराने या वाहनतळांचा वापर व्यावसायिक दृष्ट्या सुरु झाला. त्यामुळे ज्या प्रतिष्ठानांमधील बेपत्ता वाहनतळे शोधून काढण्याचे कठीण काम आहे. यामुुळे अपघात वाढले आहेत. म्हणून व्यापारी संकुलातील वाहनतळ सुरु करण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. मंगळवारी महत्त्वाच्या दहा संकुलातील वाहनतळांचा शोध घेण्यात आला. ही मोहीम निरंतर सुरु राहणार असून वाहनतळ नसणाऱ्या संकुलाचे बांधकाम परवाने रद्द केले जातील. ही कारवाई नगररचना विभागाचे सुरेंद्र कांबळे, दीपक खडेकार, हेमंत महाजन, घनशाम वाघाडे, योगेश इंगळे, अजय विंचुरकर, गणेश कुत्तरमारे आदींनी केली. या संकुलांची झाली तपासणीसंकुलातून वाहनतळ बेपत्ता झाल्या प्रकरणी याची शोधमोहिम सुरू आहे. यात कुशल आॅटो प्रा.लि., प्रेम कॉम्प्लेक्स, पोतदार कॉम्प्लेक्स, गुरुधन चेंबर्स, शिवाजी कर्मशिअल, बग्गा मार्केट, गुलशन प्लाझा, मुंशी कॉम्प्लेक्स, हॉटेल ग्रॅड महेफिल, खत्री कॉम्प्लेक्स, धोतीवाला कॉम्प्लेक्स, चांडक टॉवर्स या १० संकुलांच्या वाहनतळाची तपासणी करण्यात आली आहे.वाहनतळ चोरीस गेल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पोलीस प्रशासनाने देखील रस्त्यावर वाहने उभी राहात असल्याची बाब गांभीर्याने घेतली आहे. संकुलांना वाहनतळ असल्याशिवाय बांधकामाला परवानगी देता येत नाही. त्यामुळे वाहनतळ गेले कुठे? याची तपासणी केली जात आहे. -सुरेंद्र कांबळे, एडीटीपी, महापालिका
संकुलातील वाहनतळ गेले कुठे?
By admin | Published: March 25, 2015 11:56 PM