अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखण्याप्रकरणी गठित चौकशी समितीचा अहवाल केव्हा सादर होणार, असा सवाल राज्यपाल नामित सिनेट सदस्य मनीष गवई यांनी उपस्थित केला आहे.
विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात एमबीएच्या शुभम पांडुरंग चोंदे, सुमित राजेंद्र गणोरकर, केतकी राजेंद्र पाटील, अनुश्री पांडुरंग देशमुख या मुलांचे प्रवेश रोखून ठेवले आहे. त्यानी एमबीए सेमिस्टर- ४ ची परीक्षा दिली असून त्या परीक्षेचा निकाल विद्यापीठाने रोखला आहे. हेमा शरद शर्मा या विध्यार्थिनीचा प्रवेशच रद्द करण्याबाबत विद्यापीठाने गठित केलेल्या समितीचा अहवाल तात्काळ सादर करावा, अशी मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी कुलगुरुंना दिलेल्या निवेदनातून केली आहे. विद्यापीठाने वारंवार पत्र पाठवूनही माजी विभागप्रमुखांचा समितीला ‘नो रिस्पोन्स‘ देत असून समितीला व विद्यापीठाला गंभीरतेने घेत नसल्याबाबत गवई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे विद्यापीठ विद्यार्थी हिताचे की कुणाच्या मर्जीचे, असा सवालही निर्माण केला आहे.
मनीष गवई यांनी १२ मार्च २०२१ च्या अधिसभेत हा मुद्दा कुलगुरूंच्या परवानगीने येणाऱ्या लक्ष्यवेधी क्रमांक २ मध्ये मांडला. ज्यात कुलगुरूंनी त्रुटी राहिल्याचे कबूल करून याप्रकरणी सिपना महाविद्यालयाचे प्राचार्य संजय खेरडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करून चौकशी आरंभल्याचे सभागृहाला सांगितले. समिती अध्यक्षांनी या प्रक्रियेशी संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी केली. परंतु एमबीए विभागाचे माजी विभागप्रमुख चौकशी समितीला प्रतिसाद देत नाही, असा आक्षेप घेण्यात आला आहे.