वरूड : शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर असताना, या भागाचे खासदार रामदास तडस यांनी नगर परिषद सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नगर परिषदेची संभाव्य निवडणूक लक्षात पाहून ती बैठक झाली. मात्र, त्यापूर्वी व त्यानंतर खा. तडस वरूडकडे फिरकले नाहीत.
वरूड तालुका अमरावती जिल्ह्यात असला तरी लोकसभेसाठी हा तालुका वर्धा मतदारसंघात मोडतो. येथील हजारो नागरिक त्रस्त असताना, खासदार गेले तरी कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. केवळ लोकसभेच्या निवडणुकीत मोठमोठे आश्वासन देऊन पक्षीय कार्यक्रम आणि कार्यकर्ते सांभाळण्यात व्यस्त असलेले खासदार नागरिकांच्या समस्येकडे लक्ष देणार काय, असा सवाल नागरिक विचारात आहेत. एक वर्षांपासून कोरोनाने वरूड तालुक्यात थैमान घातले. अधिकारी प्राणाची बाजी लावून काम करीत असताना, लोकप्रतिनिधी गप्प आहेत.
मागच्या वेळी नगराध्यक्ष, नगरसेवकांनी चौकाचौकांत छायाचित्रात काढून स्वत:ला स्वयंघोषित कोरोनायोद्धा घोषित केले. आता हे कोरोनायोद्धासुद्धा गायब झाले आहेत. या भागाचे खासदारसुद्धा अनेक महिन्यांनंतर वरूडमध्ये झळकले. परंतु, अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन मोकळे झाले. मात्र, तालुक्यातील समस्येवर कागदोपत्री माहिती घेऊन कुठल्याही समस्येचे निराकारण झाले नाही. संचारबंदीला विरोध करणाऱ्यांवरदेखील त्यांनी मौन बाळगले.