अमरावती : मोर्शी तालुक्यातील तरोडा येथील दोन वृद्धांचा विषारी दारू प्राशन केल्याने मृत्यू झाला. या विषारी दारूचे एमपी कनेक्शन समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर ही हातभट्टीची दारू नेमकी कुठून आली, हे शोधण्यासाठी ‘लोकमत’च्या चमूने तरोडा येथे भेट दिली. त्यानंतर, धारूरमार्गे मध्य प्रदेशातील नढा व मानी गावापासून वाहणाऱ्या नदीकाठी भेट देऊन वास्तव जाणून घेतले. तरोडा येथे आलेली ती दारूही मध्य प्रदेशातील आठनेर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या व जंगल क्षेत्रातून आल्याचे या दरम्यान उघड झाले.
तरोडा येथील मयाराम धुर्वे व जंगलू टेकाम या दोघांचा १९ जुलै रोजी रात्री ९ च्या सुमारास विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाला होता. अटक केलेल्या राजकुमार सुरेश साबळे (रा.तरोडा) याने ही दारू मयाराम धुर्वे याच्या घरी पोहोचवून दिली होती. दोघांचा बळी घेणारी विषारी दारू भिवकुंडी येथील श्यामजी जीवन उईके याने मध्य प्रदेशातील आठनेर तालुक्यात अवैधरीत्या बनविली होती. मध्य प्रदेशातील आठनेर तालुक्यातील नढा, मानीशेजारच्या नदीकाठी घनदाट जंगलात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या हातभट्टीची दारू बनविली जात असल्याचे ‘लोकमत’च्या चमूला आढळून आले.
आठनेर तालुक्यातून रोज नऊ ट्युब दारू
तरोड्यावरून चिंचोली गवळीमार्गे धारुरला पोहोचले की, आपण मध्य प्रदेशात येतो. अर्थात, तरोड्याहून केवळ पाच किमी अंतरावर धारुर आहे. धारुरच्या पुढे सात आठ किमीवर नढा व मानी ही गावे असून, त्या गावांपासून वाहणाऱ्या नदीकाठी घनदाट जंगल आहे. त्याच जंगलात हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणात काढली जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. केवळ तरोडा, धानोरा व भिवकुंडी या तीन गावांचा समावेश असलेल्या गट ग्रामपंचायत हद्दीत रोज नऊ ट्युब दारू रिचवली जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. एका ट्युबमध्ये सुमारे ५४ लीटर दारू येते.
मोर्शीमार्गे वर्ध्याला तस्करी
आठनेर तालुक्यातील नदीकाठी हातभट्टीची दारू गाळली जाते. तेथून दररोज सुमारे ५० ट्युब मोर्शी तालुक्यात येतात. त्यातील काही दारू सिंभोरामार्गे ट्युबद्वारेच वर्ध्याला पोहोचविली जात असल्याची माहिती मिळाली. ती दारू भिवकुंडीमार्गे मोर्शी तालुक्यात ट्युबद्वारे निवडक मुख्य विक्रेत्यांकडे पोहोचविली जाते. तेथून ती लीटरच्या प्रमाणात तरोडा, धानोरा, भिवकुंडी व मोर्शी येथील किरकोळ विक्रेत्यांकडे पोहोचविली जाते. पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरदहस्तामुळे तो अवैध गोरखधंदा बिनधास्त सुरू आहे.