अमरावती : महापालिकेत दरमहा सेवानिवृत्तांची संख्या वाढतच आहे. दुसरीकडे नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा, सुविधांसाठी मनुष्यबळ तोकडे पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने ‘आऊट साेर्सिंग’द्धारे मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता निविदा प्रक्रियादेखील राबविली. मात्र, महिना लोटल्यानंतरही मनुष्यबळ कंत्राटाची फाईल अडली कुठे? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
महापालिकेचा प्रशासकीय विभाग, शिक्षण विभाग तसेच झोन कार्यालयात विविध कामांसाठी ३०० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नेमले जाणार आहे. हे मनुष्यबळ कंत्राटी असून, ते पुरविण्यासाठी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. डॉक्टर्स, परिचारिका ते लिपिक असे मनुष्यबळ ‘आऊट साेर्सिंग’द्धारे नेमण्यासाठी ३ मे २०२१ रोजी निविदा उघडण्यात आली. आठ एजन्सींनी यात सहभाग घेतला आहे. मात्र, महापालिका याबाबत निर्णय का घेत नाही? याविषयी शंका उपस्थित होत आहे. निविदा उघडल्यानंतर महिनाभर त्या फाईलवर काहीही झाले नाही, अशी घटना महापालिका इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे.
--------------
‘क्षितीज‘ला मुदतवाढीतून लाभ कुणाला?
अगोदर महापालिकेत ‘आऊट साेर्सिंग’द्धारे २९० मनुष्यबळ पुरविण्याचा कंत्राट मे. बेराेजगारांची क्षितीज नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित यांना देण्यात आला होता. ‘क्षितीज’च्या कंत्राटाची मुदत ७ नोव्हेंबर २०२० रोजी संपुष्टात आली. ८ नोव्हेंबर २०२० ते ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता पुन्हा चार महिने लोटले. तरीही मुदतवाढ सुरूच आहे. नवीन कंत्राट नेमण्यासाठी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. असे असताना वारंवार जुन्याच कंत्राटदाराला मुदतवाढ देण्याचा सपाटा सुरू असल्याने याचा लाभ कुणाला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
---------------------
आठ एजन्सी स्पर्धेत
महापालिकेत ‘आऊट साेर्सिंग’ मनुष्यबळासाठी आठ एजन्सीच्या निविदा उघडण्यात आल्या. मात्र, प्रशासनाकडून फाईल पुढे सरकत नसल्याचे वास्तव आहे. यात छत्रपती शिवाजी स्वयंरोजगार संस्था (नांदेड), जानकी सुशिक्षित (अमरावती), महात्मा फुले (पभरणी), स्वस्तिक संस्था (अमरावती), क्षितीज सेवा सहकारी (अमरावती), ईटकॉन्स ई सोलुसन्स (नोयेडा), पेटल काॅन्ट्रॅक्टर्स (नागपूर), श्रीपाद अभियांत्रिकी (यवतमाळ) या स्पर्धेत आहेत.
-----------
कोट
‘आऊट साेर्सिंग’ मनुष्यबळ कंत्राटाच्या निविदा उघडल्या आहेत. पुढील प्रक्रिया सुरू असून, लवकरच एजन्सी निश्चित करण्यात येईल.
- प्रशांत रोडे, आयुक्त. महापालिका