अनलॉक झाल्यानंतर अमरावती शहराने पुन्हा बाजारपेठांमध्ये हालचाल अनुभवली आणि दुकानदारांचा इशारा - इथे वाहन लावायचे नाही. काही जण हे मुकाट ऐकून पुढे जातात. मात्र, काही जण अद्दल घडवायच्या हिशेबाने जागा अडवितात. त्यानुसार सोमवारी एक कार जयस्तंभ चौकात कन्फेक्शनरीच्या दुकानापुढे उभी झाली. मालकाने ती हटवायला सांगण्यापूर्वीच त्यामधून उतरलेल्या दाम्पत्याने मुलाला पुढे केले आणि काय घ्यायचे आहे, असे विचारले. मुलाने अवघ्या दोन रुपयाच्या टॉफीकडे बोट दाखविले. दुकानदाराला गप्प केल्यानंतर हे जोडपे गाडी तेथेच ठेवून तासभर गायब झाले. दुकानदाराचा ‘मामा’ झाला, हे नक्की.
- धीरेंद्र चाकोलकर, अमरावती
----------------
रिकामी खुर्ची दाखवू नकाफोटो - २३एएमपीएच०१
भाजपने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर अमरावतीत आ. संतोष कुंटे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. माजी आमदार सुनील देशमुख काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर लागलीच हे होत असल्याने नाही म्हणायला भाजपच्या गोटात अस्वस्थता होतीच. त्यात पत्रपरिषदेला सुरुवात होत असताना एक खुर्ची रिकामी होती. कारण आमदार प्रवीण पोटे यांना येण्यास उशीर होता. तेव्हा ती खुर्ची कॅमेऱ्यात टिपली जाऊ नये व त्याद्वारे चुकीचा संदेश पसरू नये, यासाठी उपस्थित पत्रकारांनाच ‘आमदार साहेब येईपर्यंत फोटो काढू नये’ अशी विनंती करण्यात आली. त्यातून कोणता संदेश घ्यायचा, हे ज्याचा त्याने घेतलाच.
गणेश वासनिक, अमरावती