लोकमत विशेष
फोटो पी १७ पांढरा पूल फोल्डर
नरेंद्र जावरे
परतवाडा : परतवाडा-बैतुल या आंतरराज्य महामार्गावरील पांढरा पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. एक महिन्यापासून त्या खड्ड्यांमुळे अपघाताची भीती वर्तविली जात आहे. अचलपूर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनमुळे जीवितहानी होण्याची भीती आता वर्तविला जात आहे.
बैतुल ते अकोट आंतरराज्य मार्गावर चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. त्यामध्ये परतवाडा शहरातूनसुद्धा सिमेंट काँक्रीट रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. चिखलदरा स्टॉपवर पांढरा पूल निर्मितीच्या कामाला संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीला सुरुवात करायची होती. परंतु, अचलपूर नगरपालिकेने जुळ्या शहरांसाठी चंद्रभागा प्रकल्पावरून आणलेली पाईप लाईन थेट पुलावरून असल्याने हे काम थंडबस्त्यात पडून आहे. आता दुसरीकडून पाईप लाईन टाकली असली तरी त्यातून पुरवठा सुरू झाला नाही, तर अडथळा ठरलेली ही पुलावरील पाईप लाईन असूनही अचलपूर नगरपालिकेच्यावतीने काढण्यात आलेली नाही.
बॉक्स
जड वाहतूक, डंपर सुसाट
मध्य प्रदेशातून बैतुल, भैसदेही मार्गे येणारा हा मार्ग आंतरराज्य आहे. अमरावती-अकोला-धारणी-इंदूरसाठी याच मार्गावरून वाहनधारकांना जावे लागते. मध्य प्रदेशच्या रेतीचे डंपर सुसाट वेगाने याच मार्गावरून धावततात. रात्रंदिवस जड वाहतूक असते. पांढऱ्या पुलावर डांबरीकरण करण्यात आले होते. त्यावरसुद्धा आता खड्डे पडल्याने पादचाऱ्यांसह दुचाकी ऑटो व चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
बॉक्स
पाईप लाईन टाकली, जोडणी बाकी
परतवाडा शहरात जाणारा मार्ग आल्याने पांढरा पुलावरून सर्वाधिक वाहतूक आहे. चंद्रभागा प्रकल्पावरून जुळ्या शहराच्या पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन खालून टाकण्यात आली असली तरी तिची जोडणी बाकी आहे. दुसरीकडे पुलावरील पाईप लाईन अजूनही काढण्यात आली नाही. त्यामुळे पुलावरून पाणी काढण्यासाठी जागा नसल्याने डांबरीकरण व खड्डे बुजवण्यासाठी राष्ट्रीय प्राधिकरण विभागाला पर्याय उरला नसल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
मुख्याधिकारी घेत आहेत माहिती
अपघातामुळे साडेतीन महिन्यांपासून आजारी असलेले अचलपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले रुजू झाले असले तरी पूर्णपणे तंदुरुस्त झाले नाहीत. पांढरा पूलवरील पाईप लाईन काढून अडथळा दूर करण्यासाठी संबंधित विभाग व कंत्राटदारांशी बोलून अडचण दूर केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोट
पुलाखालून थेट मुगले येथील पाणी टाकीपर्यंत पाईप लाईन टाकण्यात आली आहे. त्याची जोडणी बाकी असून, संबंधित विभाग व अभियंत्यांशी बोलून अडथळा दूर करण्यात येईल.
- राजेंद्र फातले, मुख्याधिकारी, अचलपूर
कोट
नगर पालिकेला पाईप लाईन काढण्याचे पत्र दिले. पुलावर डांबरीकरण केले, पण उतार असल्याने तेथे पाणी काढण्यासाठी जागा नाही. पाइपलाइन निघताच तशी व्यवस्था करून मार्ग सुरळीत करण्यात येऊ. तूर्तास पुन्हा खड्डे बुजविण्याचे कंत्राटदाराला सांगण्यात आले आहे.
- पी.एस. वासनकर, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग