लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा कापसाच्या उत्पादनात कमी आलेली असतानाच दरात मात्र, झळाळी आलेली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. रुईची दरवाढ होत असल्याने यंदा कापूस दहा हजार पार करण्याची शक्यता आहे. दरवाढीच्या आशेमुळे शेतकरीदेखील कापसाची साठवणूक करीत असल्याचे दिसून येते.लांग स्टेपलच्या कापसाला यंदा ६,०२५ रुपये क्विंटल हमी भाव जाहीर करण्यात आलेला आहे; परंतु हंगामाचे सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावपेक्षा जास्त दर मिळत आहे. यंदा हलक्या जमिनीच्या भागात दोन वेच्यात उलंगवाडी होत आहे तर भारी जमिनीमध्ये अतिपावसाने बोंडसडचे संकट उद्भवले आहे. याशिवाय बोंड फुटत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे काही शेतकरी कपाशी काढून हरभरा, गव्हाची लागवड करीत असल्याचे दिसून येते. एकूणच कापसाचे पीक चांगले दिसतानाही उत्पादनात कमी येत असल्याचे वास्तव आहे. दिवाळीपश्चात कपासाची भाववाढ सुरू झाली. आठ हजारांवर महिनाभर स्थिरावल्यानंतर आता भाव नऊ हजारांवर आलेले आहे. खासगीमध्ये दरवाढ होत असल्याने पणन महासंघाद्वारा यंदा खरेदी होणार नाही, ही बाब आता स्पष्ट झाली आहे. कोरोना संसर्ग माघारल्यानंतर कापसाच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कापूस पणन महामंडळ (सीसीआय) लादेखील यंदाच्या हंगामात खासगी बाजारात उतरून कापूस खरेदी करण्याची गरज भासणार नाही, असेच एकूण चित्र आहे.
खेडा खरेदीत शेतकऱ्यांची लूटकाही शेतकरी गावातील व्यापाऱ्यांना कापसाची विक्री करीत आहेत. यामध्ये भाव कमी व शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे दिसून येते. अनेकदा हे व्यापारी अडचणीच्या वेळी मदत करतात व त्याबदल्यात कापसाची खरेदी करतात. गावपातळीवर वजनमापातही हेराफेरी होते.
कापसाचे तालुकानिहाय क्षेत्रजिल्ह्यात यंदा २.२७ लाख हेक्टरमध्ये कपाशीचे पेरणीक्षेत्र आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ९,३०० हेक्टर, चिखलदरा २,३४७, अमरावती १३,६४०, भातकुली १०,९४३, नांदगाव खंडेश्वर ६,०७६, चांदूर रेल्वे ८,२८५, तिवसा १६,६७८, मोर्शी १६,६७८, वरुड २७,८६४, दर्यापूर ३२,१२०, अंजनगाव सुर्जी १६,४२०, अचलपूर १७,८७१, चांदूरबाजार १७,२६६ व धामणगाव तालुक्यात २१,०८७ हेक्टर क्षेत्र आहे.
राज्यात कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. मागणी वाढल्याने कापसाचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांची होल्डिंग कॅपेसिटी वाढली आहे. आणखीन ४०० ते ५०० रुपयांपर्यंत दरवाढ अपेक्षित आहे.- नीलेश लोहाणा, कॉटन ब्रोकर