लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दर्यापूर तालुक्यात सन २०१७-१८ मध्ये कपाशीचे उत्पादन अंदाजापेक्षा फारच कमी आले आहे. शेतकऱ्यांनी सुरुवातीला हवामान खात्याच्या अंदाजानुसार कपाशीची पेरणी जास्त प्रमाणात केली. तालुक्यात २६ हजार ६७५ हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी दहा क्विंटल कापूस व्हायचा, तेथे पाच क्विंटलपर्यंत उत्पादन घसरले. शेतकऱ्यांनी हेक्टरी कपाशीवर ५० हजार रुपये खर्च केला आहे; मात्र कापसाच्या रूपाने त्यांना फक्त २५ ते ३० हजार रुपये हेक्टरी उत्पन्न निघणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ठरलेले आहे.कपाशीचे पीक हे शेतकऱ्यांमध्ये पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. मात्र, एका पाण्यामुळे संपूर्ण पिक नष्ट झाल्याचे तालुक्यातील सद्यस्थिती आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना हेक्टरी ४० क्विंटल कापूस झाला होता. यावर्षी मात्र शेतकऱ्यांनी दोन वेचे काढल्यानंतर आपल्या शेतातील पिकाची उलंगवाडी करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.यावर्षी जमिनीतील ओलावा घटल्यामुळे हिवाळ्यापर्यंत कपाशीने तग धरला नाही. त्यामुळे थंडीची कपाशीची बोंडे लागणार नाहीत, हे नक्की झाले आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षामध्ये शेतकºयांना कपाशीचे पीक हे ३० टक्के होणार असल्याचे आमच्या सर्वेक्षणानुसार आढळून आले आहे.- राजू तराळ, कृषी अधिकारी (प्रभारी), दर्यापूर
पांढरे सोने झाले काळे; दर्यापूर तालुक्यात पाण्याअभावी कपाशीचे पीक नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:00 PM