लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : दीडशे कोटी रुपये कामे न करताच भ्रष्टाचार केल्याचा आरोप आपणावर करण्यात आला. सामाजिक व्यासपीठावरून माझ्याविरुद्ध गरळ ओकण्यात आली. मी एक आदिवासी आमदार असताना अपमानजनक शब्दांचा वापर केला गेला. आपण भ्रष्टाचार केला असेल, तर त्याचे पुरावे द्या. आपण कुठे पैसे खाल्ले ते सांगा, मैदानात आमने-सामने या, असा इशाराच आमदार राजकुमार पटेल यांनी बडनेराचे आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा या दाम्पत्याला दिला.
आपण आदिवासींचे रक्त पित नसून जीवन वाचविण्यासाठी रात्रंदिवस त्यांना रक्त देत असल्याचे त्यांनी धारणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. राणा दाम्पत्याने धारणी येथील कार्यक्रमात आमदार राजकुमार पटेल यांच्याविरुद्ध दीडशे कोटी रुपये हडपण्यासह विविध गंभीर आरोप केले होते. हे आरोप होताच मेळघाटातील समर्थक आदिवासी महिला, पुरुषांनी रविवारी मोठ्या प्रमाणात राणादाम्पत्याविरुद्ध निषेध रॅली काढली. त्यानंतर राजकुमार पटेल यांनी आरोपांना पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
सांगा, कुठे रस्ता नाही झाला? आमदारकीच्या काळात विकासकामे मेळघाटात आणली. रस्त्याची कामे ज्या विभागाने केली, ती यादी बघून माझ्यासोबत चला. कुठे रस्ता नाही झाला, ते सांगा. ग्रामपंचायतकडे विद्युत दिवे लावण्याचा अधिकार असताना त्यात मी कुठे आलो, असा प्रश्न आ. पटेल यांनी केला.
केंद्रातून का आणली नाही ४० गावांची परवानगी? माजी खासदार नवनीत राणा यांनी रस्त्यांसंदर्भात केंद्राकडे मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत असलेल्या ४० गावांतील अडकलेल्या रस्त्यांची परवानगी का आणली नाही? मेळघाटसाठी कुठले विकास काम केले, ते जनतेला दाखवा, वनविभागाचे नियम पायदळी तुडवून स्वतःसाठी खासदार-आमदार निधीतून कोणी रस्ते तयार केले, हे बघा आणि नंतर बोला, असेही आमदार राजकुमार पटेल म्हणाले.