अमरावती : महापालिकेची गोपालनगरातील मराठी शाळा तीन दिवसांपूर्वी कुणी पाडली, असा सवाल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी आयुक्त प्रशांत रोडे यांना केला. पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेता आयुक्तांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार करणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.
महापालिकेतील सत्तापक्षाच्या एका नगरसेवकानेच हे कृत्य केले आहे. याबाबतचे पुरावे आमच्याजवळ आहेत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत शिक्षण विभागाचे पदाधिकारी सध्या घटनास्थळी पंचनामा करीत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. याप्रकरणी कुणाचीही हयगय न करता पोलीस तक्रार केली जाणार असल्याचे आयुक्त म्हणाले. यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, माजी महापौर व ज्येष्ठ सदस्य विलास इंगोले, शिवसेनेचे गटनेते राजेंद्र तायडे, प्रशांत वैद्य, मंजूश्री जाधव, अर्चना धामणे, राहुल माटोडे, सुनील खराटे, ललित झंझाड, पराग गुडधे, पंजाबराव तायवाडे, संजय शेटे आदी उपस्थित होते.