अमरावती : आदर्श कोगे या १२ वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असला, तरी अविरत प्रयत्नानंतरही मारेकऱ्याचा चेहरा उघड करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. वसतिगृहाच्या ज्या गृहपालाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, तो अधीक्षक केवळ चौकशीसाठी ताब्यात असल्याचे गाडगेनगर पोलिसांचे म्हणणे आहे. त्याला अद्यापही अटक करण्यात आली नसताना, दुसरीकडे ९६ तासांनंतर आदर्शचा गळा नेमका कुणी दाबला, श्वासावरोध नेमका कशामुळे झाला, अर्थात आदर्शचा खून नेमका कुणी केला, कुणाच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला, असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
येथील रामपुरी कॅम्प भागातील पत्रकार कॉलनीस्थित विद्याभारती मागासवर्गीय वसतिगृहातील हॉलमध्ये आदर्श कोगे (१२, जामलीवन, ता. चिखलदरा) याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. २१ जुलै रोजी सकाळी ७ च्या सुमारास ती घटना उघड झाली. मात्र, आपल्या मुलाचा मृत्यू नैसर्गिक नसून संशयास्पद असल्याचा जोरदार आक्षेप आदर्शच्या वडिलांनी केला. त्यामुळे पारदर्शक चाैकशीची ग्वाही देऊन आदर्शचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथे पाठविण्यात आला. तर दुसरीकडे पोलीस आयुक्तांसह उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त व ठाणेदारांनी वसतिगृह गाठून चौकशी आरंभली.
२२ जुलै रोजी प्राथमिक पीएम रिपोर्ट आला. नाक व तोंड दाबल्याने श्वासावरोध निर्माण झाला, त्यामुळे आदर्शचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष व आदर्शच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, २२ जुलै रोजी सायंकाळी ५.३५ च्या सुमारास गृहपाल रवींद्र पांडुरंग तिखाडे (५०, प्रियंका कॉलनी) याच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाला गती आली. तिखाडे याला शुक्रवारीच ताब्यात घेण्यात आले, तर वसतिगृह व विद्यालयाशी संबंधित अनेकांचे बयाण नोंदविण्यात आले. मात्र, आदर्शशी नेमके कुणाचे भांडण झाले, हे सांगायला कुणीही तयार नाही. वसतिगृहातील मुलांशी बाचाबाची झाल्याने गृहपालाने आपल्याला मारले, असे २० जुलै रोजी रात्री ८ च्या सुमारास आदर्शने आपल्याला व्हिडीओ कॉल करून सांगितले. त्यामुळे आपला तिघाडेवर संशय असल्याची तक्रार आदर्शच्या वडिलांनी केली. त्याअनुषंगाने काही मुलांचे बयाणदेखील नोंदविण्यात आले, तर तिघाडे यांनी नकारघंटा कायम ठेवली आहे.
सीसीटीव्ही नसल्याने गुंता वाढला
ज्या हॉलमध्ये आदर्शचा मृत्यू झाला, त्या हॉलमध्ये सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्याबाबत संस्था चालकांनी देखील चकार शब्द काढलेला नाही. नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने ते बसविले नाही, बसविणारच होतो, अशी वेळकाढू थाप मारली गेली. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांमध्ये भयगंड निर्माण झाल्याने गेल्या चार दिवसांपासून वसतिगृहाला गळती लागली आहे. तेथील सर्व विद्यार्थी अवघ्या १२ ते १६ वयोगटातील असल्याने पोलिसांच्या ‘इंट्रागेशन’ला मर्यादा आल्या आहेत.