लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : येणी पांढरी शिवारात बुधवारी सकाळी १० वाजता उघडकीस आलेल्या दुहेरी हत्याप्रकरणात गुरुवारी सुधीर बोबडेवर शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. हत्याकांड घडविणारा तिसरा कोण, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर चार चमू नियुक्त केल्या. त्यामध्ये सहा अधिकारी व २४ कर्मचारी अशा ३० जणांची नियुक्ती करण्यात आली. त्या स्वतंत्र तपास करणार आहेत.येणी पांढरी येथील राकेश अग्रवाल यांच्या शेतात सुधीर रामदास बोबडे (५२, कॉलनी परिसर, कांडली) व ४८, वर्षीय महिलेचा मृतदेह शेतातील शेडमध्ये आढळून आला होता. प्रथमदर्शनी पोलिसांना आत्महत्या वाटत असली तरी बुधवारी रात्री मृत महिलेच्या पतीने परतवाडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आता त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली आहे. विवाहबाह्य प्रेमसंबंधातून घडलेल्या या हत्याकांडाचे गांभीर्य पाहता शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक टीमकडून झालेला तपास आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या चार चमूंनी वेगवेगळ्या केलेल्या तपासाअंती या प्रकरणातील गूढ पुढे येणार आहे. त्याचा निष्कर्ष कितपत धक्कादायक असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मृत महिला, सुधीरच्या पत्नीची हाणामारी- मृत महिला व सुधीरची पत्नी यांच्यात यापूर्वी दोघांच्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून हाणामारी झाल्याचे पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे सुधीरची पत्नी तिच्या घरासमोर येऊन भांडण करून सांगत होती. यादरम्यान सुधीर व मृत महिला एकमेकांना चाकूने मारून हत्या करू शकत नाहीत. रात्री त्यांच्यावर कोणी तरी पाळत ठेवून हत्या केल्याचे फिर्यादीत नमूद असल्याने पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधीक्षक घटनास्थळी- जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी गुरुवारी सकाळी येणी पांढरी येथील शेतशिवारात घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर जिल्हा क्राईम ब्रँच, परतवाडा, अचलपूर व सरमसपुरा येथील अधिकारी यांची बैठक घेतली व आवश्यक सूचना दिल्या.
सुधीर बोबडेवर अंत्यसंस्कार- बुधवारी शवविच्छेदनासाठी वेळ झाल्याने सुधीर बोबडे याच्या मृतदेहाचे गुरुवारी सकाळी तीन डॉक्टरांच्या चमूने शवविच्छेदन केले. दुपारी अंत्यसंस्कार पार पडले. कुठलीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलीस विभाग सतर्क आहे.