फोटो पी ३१ पथ्रोट
पथ्रोट : सुमारे १ लाख १४ हजार ८३४ रुपये मूल्यांकन असलेल्या पथ्रोट येथील खासगी व्यक्तीच्या प्लॉटमधील तसेच ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेतील भलीमोठी चिंचेची झाडे तोडण्यामागे मास्टरमाइंड कोण, त्या कत्तलीला मूक संमती दिली कुणी, अशी चर्चा आता गाववर्तुळात रंगली आहे. वन विभागाने मात्र प्लॉटमालकावर गुन्हा दाखल केला आहे.
वाॅर्ड क्रमांक ६ मध्ये जयसिंग महाराज मंदिर सभागृहासमोर खासगी प्लॉटवर तीन झाडे होती. त्यातील दोन मोठी चिंचेची, एक चिरेलचे तसेच ग्रामपंचायतच्या हद्दीत दोन मोठी चिंचेची झाडे होती. ही सर्व झाडे ७० वर्षांपेक्षा अधिक जुनी असल्याचे बोलले जात आहे. त्या वृक्षतोडीला मूक संमती देणारा ग्रामपंचायत पदाधिकारी कोण, हे सध्या गुलदस्त्यात आहे. त्या पदाधिकाऱ्याच्या ‘आशीर्वादा’ने ही मोठी झाडे तोडण्याचा प्रकार घडून आला.
वनविभाग व ग्रामपंचायतीच्या कुठल्याच परवानगीची तमा न बाळगता अंजनगाव येथील आरामशीन व्यापाऱ्याशी सर्व झाडांचा सौदा झाला. मग, अडचण होती ती फक्त तोडलेल्या झाडांची वाहतूक करण्याची. त्याकरिता वाहतूक पास मिळवून देण्यासाठी ‘त्या’ पदाधिकाऱ्याने ग्रामपंचायत कार्यालयाची दिशाभूल केली. एका व्यक्तीच्या घरी जुने लाकूड आहे. त्याची वाहतूक करायची आहे, असे सांगून पास मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने प्लॉट मालकाच्या नावातसुद्धा बदल केला. त्याच क्षणी मिळालेल्या तोंडी तक्रारीत व पदाधिकारीच्या सांगण्यात विसंगती निर्माण झाल्याने कार्यालयाला संशय आला. म्हणून तेथील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष मोका पाहणी करून खात्री केल्यावर सदरचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे ग्रामपंचायतीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत वनविभाग व पोलीस स्टेशनला कारवाईसाठी पत्रव्यवहार केला.
वनिवभागाने केला पंचनामा
वनविभागाने तात्काळ सर्व तोडलेल्या लाकडांचा पंचनामा करून १ लाख १४ हजार ८३४ रुपयाची किंमत मूल्यांकन केले. याबाबत त्यांनी प्लॉट मालकावर महाराष्ट्र वन कायदा अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल केले. दुसरीकडे पोलीस ठाण्याने विनापरवानगी वृक्ष तोडून चोरून नेल्याच्या कलमाखाली संबंधित व्यक्तीसह लाकूड व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
पदाधिकाऱ्याने खोटी माहिती देऊन कार्यालयाशी दिशाभूल करून या प्रकरणात महत्त्वाची भूमिका वठवली असल्याने या प्रकरणात आता पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.