धारणी : आदिवासी विकास महामंडळ यांच्याद्वारे यंदा रबी हंगामात मका खरेदी केंद्राबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता व्यापाऱ्यांशी संगणमत करून गुपचूपपणे मका खरेदी करण्याचा डाव रचण्यात आलेला आहे. आदिवासी विकास महामंडळातर्फे गेल्यावर्षीपासून रबी हंगामातील मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत . त्या अनुषंगाने यंदा रबी हंगामातील मका खरेदी सुरू करण्याबाबत कोणत्याही प्रकारच्या प्रचार-प्रसार न करता महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुपचूपपणे सर्व प्रक्रिया राबविल्याची माहिती आहे. आज ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची अंतिम तारीख होती. परंतु, याबाबत कोणतीही सूचना शेतकऱ्यांना नसल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेले नाही. याउलट प्राप्त माहिती प्रमाणे जवळपास २०० अर्ज ऑनलाईन करण्यात आले असून त्यापैकी नव्वद टक्के व्यापारी असल्याची माहिती आहे. यंदा खरेदी कधी सुरू होणार, खरेदी किंमत काय राहणार, याबाबत कोणतीही पूर्व सूचना प्रसारमाध्यमांना देण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे खरेदी केंद्रात कोणत्याही प्रकारची सूचना प्रकाशित करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित खरेदी केंद्रलगत असलेल्या शेतकऱ्यांना मका खरेदीबाबत ऑनलाईन करण्याबाबत कोणतीही सूचना प्राप्त झाली नसल्यामुळे शेकडो शेतकरी या खरेदी योजनेपासून वंचित राहण्याची संभावना आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने ऑनलाईन पद्धतीने खरेदी करण्याबाबतची मुदतवाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागलेली आहे. धारणी तालुक्यातील धारणी, चाकर्दा , हरीसाल , बैरागड , सादरावाडी , सावलीखेडा आणि टिटंबा या केंद्रांमध्ये आतापर्यंत खरीप हंगामाची खरेदी करण्यात येत होती. परंतु, यावेळी कोणत्या केंद्रामध्ये खरेदी सुरू होणार, मक्याचे दर काय राहणार आणि ऑनलाईन पद्धतीने नोंदणी कधीपर्यंत करता येईल याबाबत संबंधित विभागातील शेतकऱ्यांना माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर भीषण समस्या निर्माण झाली आहे. मका उत्पादकांची व्यथा मी चाकरदा येथील शेतकरी असून माझे शेतात यावर्षी रबीमध्ये मका पेरणी केलेली आहे. चाकरदा येथे आदिवासी विकास महामंडळाचे खरेदी केंद्र असून या केंद्रामध्ये मका खरेदी करण्याबाबत कोणताही सूचनाफलक आजपर्यंत लावण्यात आलेली नाही.
कोट
चौकशी केली असता शेवटची तारीख असल्याचे कळले. परंतु, तलाठी रजेवर असल्यामुळे अद्ययावत सातबारा मिळत नसल्यामुळे मी ऑनलाईन नोंदणीपासून वंचित होत आहे. यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.
- राम बेठेकर , शेतकरी चाकरदा