रिद्धपूर : गावात उमेश वानखडे यांच्या घरी झालेली चोरी केली कोणी, हा प्रश्न ज्याच्या त्याच्या तोंडी आहे. दोन लाखांचा चोरी गेलेला ऐवज त्यांच्याच घरी छतावरील गोवरीच्या पोत्यात आढळल्याची माहिती मिळाल्याने हा प्रश्न उपस्थित झाला. पोलीस सूत्रांनुसार, शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिद्धपूर येथे उमेश वानखडे व त्यांची आई किराणा आणण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी चांदूर बाजार येथे गेले होते. यादरम्यान कपाटामधील ५० हजार रुपये रोख व दीड लाखांचे दागिने असा ऐवज चोरीला गेल्याचे ५ सप्टेंबर रोजी निदर्शनास आले. त्यांच्याच घरी तीन दिवसांपूर्वी भाड्याने दिलेल्या दूध डेअरीवर काम करणाऱ्या मुलावर आळ घेण्यात आला. तक्रार प्राप्त होताच ठाणेदार विक्रांत पाटील यांनी तत्काळ पोलीस कर्मचारी पाठवून त्याला व तक्रारदार उमेश वानखडे यांना शिरखेड पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले. तुम्ही मला काहीही करा, मी चोरी केली नाही, असे मुलाने वारंवार सांगितले. ठाणेदार
विक्रांत पाटील यांनी तक्रारदार उमेश वानखडे यांच्याकडे श्वान पथकाला पाचारण करणार असल्याचे व त्याच्या निर्देशानुसार कारवाई करणार असल्याचे सांगताच उमेशने आईला फोन करून घरीच दागिने पाहा, असे सांगितले. तेथून एक तासाने त्याच्या आईने छतावरील गोवरीच्या पोत्यात मुद्देमाल सापडल्याचे सांगितले. ही वार्ता पसरताच ही चोरी कोणी केली, हा प्रश्न चर्चिला जात आहे. ठाणेदार विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.