अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असा कारभार सुरू आहे. गत सहा वर्षांपूर्वी जनरल फंडात तब्बल १०० कोटींची रक्कम जमा होती. मात्र, आजमितीला केवळ चार कोटी रुपये जमा असल्याची धक्कादायक माहिती आहे. विद्यापीठात विनाअनुदानित कोर्सेसवर दरवर्षी पाच कोटींचा खर्च होत असून तो जनरल फंडातून केला जातो. त्यामुळे जनरल फंडाला पाय फुटले की या फंडाची लूट होतेयं? याचा विचार करणे कुलगुरूंसह विद्यापीठांच्या विश्वस्तांवर मोठी जबाबदारी आली आहे.
तत्कालीन कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या कार्यकाळात विद्यापीठाच्या जनरल फंडात १४० कोटींची रक्कम हाेती. मात्र, आता जनरल फंडात केवळ चार कोटी शिल्लक आहेत. त्यामुळे या फंडातून खर्च कसा, कुणासाठी केला जातो, याविषयी विचारमंथन आणि ठोस निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. विनाअनुदानित कोर्सेसवर वर्षाला पाच कोटी रुपये खर्च केले जात असून, विद्यापीठाला या कोर्सेसमधून प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. काही कोर्सेसचे तर कागदाेपत्री प्रवेश आणि कागदावरच वेतन सुरू असल्याची माहिती आहे. एका विनाअनुदानित कोर्सेसमध्ये एका विद्यार्थ्याचा प्रवेश, तर आठ शिक्षक कार्यरत अशी अफलातून स्थिती आहे. त्यामुळे विद्यापीठात विनाअनुदानित तत्त्वावर काही कोर्सेस अनावश्यक चालविले जात असल्याचे वास्तव आहे.