वरूड : तालुक्यात कोरोनामुळे आजपर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला. परंतु, स्थानिक प्रशासनाजवळ ती आकडेवारीच नसल्याने मृतांचा नेमका आकडा किती, हा प्रश्न अनुत्तरित आहे. नागपूर, अमरावती किंवा इतर जिल्हा प्रशासन किंवा रुग्णालय प्रशासन माहितीच देत नसल्याने तो आकडा आम्हाला सांगता येणार नाही, असा तालुका आरोग्य प्रशासनाचा दावा आहे.
तालुक्यात दिवसागणिक ७० ते ८० रुग्ण कोरोनाग्रस्त होत आहेत. जिल्हास्तरावर बेड मिळत नाही, तर गरिबांना घरीच मृत्यूला कवटाळण्याची वेळ आली आहे. त्याअनुषंगाने वरूडमध्ये ५० खाटांचे कोविड रुग्णालय तयार करणे सुरू झाले असून, यामुळे रुग्णांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वरूड तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दीड हजारांच्या वर गेला असून, दिवसागणिक ३०० ते ३५० आरटी-पीसीआर कोरोना चाचण्या केल्या जातात तसेच शेकडो अँटिजेन चाचण्या होत आहेत. यामध्ये ७० ते ८० पॉझिटिव्ह येत असल्याने चिंतेचा विषय आहे. तालुक्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांना दोन वेळच्या जेवणाची चिंता भेडसावत असून, खासगी कोरोना रुग्णालयात दाखल झाल्यास हजारो रुपयांचा खर्च आणि औषधी घ्यावी लागते. ती सर्वसामान्यांची ऐपत राहिली नाही. यामुळे वरूडच्या ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय तयार केल्यास एकाच ठिकाणी सुविधा मिळू शकते, असे बोलले जात आहे. ग्रामीण रुग्णालयानेसुद्धा समर्थता दर्शविली असल्याचे सांगण्यात येते.
बॉक्स
पाठीराख्यांची ससेेहोलपट
वरूड हा सीमावर्ती भागातील तालुका असून, येथून अमरावती, नागपूर ९० ते १०० किमी अंतरावर असल्याने रुग्णांना नेण्याकरिता एक ते दीड तास लागतो. यातच कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे भाडे झेपत नसल्याने साध्या ॲम्ब्युलन्सने न्यावे लागते आणि तेथे गेल्यावर बेडसुद्धा उपलब्ध होत नाही. रुग्णांसह नातेवाइकांचीही ससेहोलपट सुरू असते. कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात असल्याने नातेवाईकसुद्धा पाठ फिरवित आहेत. वरूड तालुक्यातील मृतांची संख्या वाढत असली तरी त्याच्या नोंदी स्थानिक प्रशासनाला येत नसल्याने नेमका कोणाचा कशाने मृत्यू झाला, त्याच्या परिवारातील लोकांची काळजी कशी घ्यायची, हा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबत दाखल घेऊन स्थानिक प्रशासनाला नोंदी कळवाव्या, अशी मागणी जोर धरत आहे.