अमरावती : केवळ पदे घेऊन जागा अडवून बसणाऱ्यांना यापुढे मनसे स्थान असणार नाही. जो पक्षासाठी काम करेल, तोच पदावर राहील असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.
'विदर्भ मिशन' निमित्ताने चार दिवसापासून विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांनी बुधवारी येथील एका हॉटेलमध्ये मनसेचा अमरावती विभागीय मेळावा घेतला, यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्ष संघटनात्मक वाढीसंदर्भात कानमंत्र दिला. यापुढे संघटनात्मक पदावरदेखील काम करणाऱ्यांनाच संधी असेल. कार्यकर्त्यांनी लोकांची कामे, समस्या सोडविण्यास अग्रक्रम द्यावा, असे ते म्हणाले. काही जणांना असे वाटत असेल की मी राज ठाकरेंच्या जवळ आहे, मी पदावर कायमस्वरूपी राहू शकतो, हे डोक्यातून काढून टाका. जो काम करेन, पक्ष वाढवेल त्यालाच यापुढे मनसेत महत्वाचे स्थान मिळेल, ही बाब देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केली.यापुढे वर्षभरासाठी नियुक्त्या
मनसेत संघटनात्मक पदे घेणे म्हणजे काही शोभेची वास्तू नाही. त्यामुळे लोकांचे, प्रश्न समस्या सोडवण्याला प्राधान्य देताना संघटनात्मक बांधणी करण्यासाठी यापुढे विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती या प्रायोगिक तत्वावर वर्षभरासाठी करण्यात येईल, ही बाब राज ठाकरे यांनी स्पष्ट केली. पक्ष बांधणी करा, असा कानमंत्र त्यांना वर्षानुवर्षापासून पदावर चिटकून बसलेल्यांना गर्भित इशारा सुद्धा दिला. यावेळी अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ अमरावती या पाचही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक लक्ष
येत्या काळात जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मनसेचा झेंडा रोवण्याबाबत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. गाव, खेड्यात शाखा उघडून 'मनसे' नवा विचार घराघरात पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषद, महापालिका व नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सूक्ष्म बांधणी करावी, असा सल्ला त्यांनी दिला. जो पक्ष बांधणी करेल त्यालाच मनसेची उमेदवारी मिळेल असेही ते म्हणाले. मंचावर संदीप देशपांडे, राजू उंबरकर, अविनाश जाधव, प्रकाश महाजन, विठ्ठल लोखंडकार,अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे आदी मनसेचे नेते उपस्थित होते.