धारणी : कोरोना हॉट्स्पॉटमध्ये रुपांतरण होत असलेल्या तालुक्यातील चाकर्दा गावात शुक्रवारी ३६ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे महसूल, आरोग्य आणि पोलीस प्रशासनाने चाकर्दा गावाला भेट दिली. तहसीलदार अतुल पाटोळे, नायब तहसीलदार आजिनाथ गांजरे, ठाणेदार विलास कुलकर्णी, गटविकास अधिकारी काळे यांचेसह आरोग्य पथक दुपारी दीड वाजता गावात पोहोचले.
महसूल आणि पोलिस प्रशासनाने ३६ पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी जाऊन त्या सर्वांना घरातच राहण्याची सूचना वजा ताकीद दिली. ज्यांना कुणाला घरी राहण्यात काही अडचण असेल त्यांची व्यवस्था धारणी येथे करण्यात येईल. त्यांनी स्वखुशीने आमच्यासोबत चला, असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले होते. मात्र, सर्वांनी गावातच राहून गृहविलगीकरणात राहण्याची हमी दिली. आजारी रुग्णांना घरातच औषधोपचार करण्याची सोय करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. दिलेल्या औषधांचे योग्यप्रकारे सेवन करावे. नेहमी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा आणि सामाजिक अंतर ठेवावे व शासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची सूचना तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दिली.