अमरावती - शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बंड करण्यात आले असून अजित पवारांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामध्ये, गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने ईडी आणि इन्कम टॅक्सच्या रडारवर असलेल्या हसन मुश्रीफ यांचाही समावेश आहे. हसन मुश्रीफ यांनीही भाजपासोबत सत्तेत जाऊन मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावरुन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला आणि हसन मुश्रीफ यांना लक्ष्य केलं. मुख्यमंत्री असताना मी घरात बसलो होतो, पण मी घरफोडी केली नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनीभाजपावर निशाणा साधला. तसेच, हसन मुश्रीफ यांनाही लक्ष्य केले.
घरफोडे तुम्ही आहात. मी घरात बसून जे काम केले, ते तुम्हाला घर फोडूनही करता येत नाही. त्यामुळेच तुम्हाला दारोदारी जावं लागत आहे. सरकार आपल्या दारी म्हणता, पण तुम्हाला कोणी दारातही उभं करत नाही. मग अंगणवाडी सेविकांना बोलवता, पोलिसांना साध्या कपड्यात बसवता, असे म्हणत उद्दव ठाकरेंनी शासन आपल्या दारी या उपक्रमावर जोरदार प्रहार केला. ठाकरेंनी भाजपच्या देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र आणि राज्य सरकावरही निशाणा साधला. निवडणूक आयोग आणि शिंदे गटालाही त्यांनी अमरावतीतील भाषणात लक्ष्य केले. यावेळी, नुकतेच मंत्री झालेल्या हसन मुश्रीफ यांचं उदाहरणही उद्धव ठाकरेंनी दिलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. तर, गेल्या काही महिन्यात ईडी व आयटीच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा हसन मुश्रीफ यांच्या घर व कार्यालयावर छापा टाकत चौकशीही केली होती. त्यावेळी, मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर, हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा यांनी आक्रमक कार्यकर्त्यांशी संवाद साधताना. “तुम्ही सगळे शांत राहा. ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगा आम्हाला गोळ्या घालून जा”, अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. यावेळी सायरा यांच्या डोळ्यात पाणी होतं. अमरावतीतील भाषणात उद्धव ठाकरेंनी या प्रसंगाची आठवण सांगत आज तेच हसन मुश्रीफ भाजपासोबत सत्तेत जाऊन बसल्याचं म्हटलं.
जगभरातील नंबर १ चे पंतप्रधान असतानाही पक्ष का फोडताय, शिवसेना फोडली, शिवसेना चोरली आज राष्ट्रवादी चोरताय. भाजपावर ही वेळ का आली, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. तसेच, सत्तेची मस्ती असल्याने मनात भीती आहे, आपण निवडून येऊ शकत नाही म्हणून समोर कोणी ठेवायचं नाही, पक्ष फोडून सोबत घ्यायचं राजकारण सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. गेल्या आठवड्यात ज्यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला तेच सोबत घेतले. हसन मुश्रीपांच्या पत्नीने आरोप केला होता, एवढ्या ईडीच्या धाडी टाकताय, त्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला. पण, आता तेच मुश्रीफ त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत, असे म्हणत मुश्रीफ यांच्यावरही उद्धव ठाकरेंनी टीका केली.
काय म्हणाल्या होत्या सायरा मुश्रीफ
हसन मुश्रीफ यांच्या पत्नीने देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. समाजासाठी मुश्रीफ साहेब एवढं काम करतात. मात्र, असे असले तरी ईडीकडून त्यांना त्रास दिला जात आहे. आम्हाला किती त्रास देणार आहात, आम्हाला गोळ्या मारून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया देखील हसन मुश्रीफ यांच्या पत्नीने दिली आहे.