वांझोटे सोयाबीन बियाणे : २७० नमुने सदोष, १०० नापास, केसेस फक्त २१गजानन मोहोड - अमरावतीजिल्ह्यात उगवणशक्ती नसल्याबाबत सोयाबीनच्या ४९८ तक्रारी दाखल आहेत. २७० प्रकरणांत तक्रार निवारण समितीने बियाणे सदोष ठरविले आहे. साधारणपणे ९० नमुने प्रयोगशाळेत नापास ठरले. अप्रमाणित बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. दुबार, तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली. तरीही निकृष्ट बियाणे देणाऱ्या कंपन्यांवर खटले दाखल करण्यास विलंब का? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.खरीप हंगाम संपायला आला असताना तालुकास्तरीय कृषी अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे निकृष्ट बियाण्यांची केवळ २१ प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत. तर केवळ ७८ शेतकऱ्यांना बियाणे व रोख स्वरुपात भरपाई मिळाली. अन्य शेकडो प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या परंतु न उगवलेल्या सोयाबीन बियाण्यांबाबतच्या ४९८ तक्रारी कृषी विभागाकडे दाखल आहेत. न्यायालयीन दाव्यांसाठी यापैकी किमान १०० प्रकरणे पात्र आहेत. परंतु कृषी विभागाने आतापर्यंत केवळ २१ प्रकरणे न्यायालयात दाखल केली. उर्वरित ७० ते ८० प्रकरणे अद्यापही न्यायालयात दाखल करण्यात आलेली नाहीत. बियाण्यांचे नमुने घेणाऱ्या पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी वेळकाढू धोरण अवंलबिले आहे, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. खरीप हंगाम संपून रबीची पेरणी सुरू झाली आहे.
खटल्यांना विलंब का?
By admin | Published: November 26, 2014 10:58 PM