दहावीचा १०० टक्के निकाल जाहीर, सीईटी परीक्षेने वाढविली विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता
अमरावती : ना शाळा, ना परीक्षा तरीही दहावीचा १०० टक्के निकाल लागला. आता खरी परीक्षा अकरावी प्रवेशासाठी सीईटीतून होणार आहे. निकाल फुगल्याने प्रवेशासाठी गर्दी होईल, यात दुमत नाही. मात्र, जागा कमी आणि विद्यार्थी जास्त अशा स्थितीत अकरावीसाठी विद्यार्थी ग्रामीण भागाकडे वळतील, अशी शक्यता आहे.
गत काही वर्षांपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. अमरावती शहरात कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी शाखेच्या अकरावी प्रवेशासाठी एकूण ६३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १५३६० प्रवेशाची क्षमता आहे. त्याअनुषंगाने गतवर्षी १०९३५ जागांवर प्रवेश देण्यात आला. ४४०७ जागांवर प्रवेश रिक्त होता. यावर्षी मात्र दहावीचा निकाल जोरात असल्याने अकरावी प्रवेशासाठी आपसूकच विद्यार्थ्यांची स्पर्धा होणार आहे. सीईटी परीक्षेत चांगल्या प्रकारे गुण मिळविणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सहजतेने नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत प्रवेश मिळेल, अशी माहिती आहे.
----------------------
अमरावती शहरात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये : ६३
एकूण जागा : १५३६०
गतवर्षी किती अर्ज आले? : १०९३५
किती जणांनी प्रवेश घेतला? : १०९३५
किती जागा रिक्त राहिल्या? : ४४०७
------------------
अकरावीसाठी गावात प्रवेश का?
दहावीचा निकाल फुगला असला तरी शहरी भागात नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात सीईटी परीक्षा देणे ‘ढ’ मुलांना शक्य नाही. त्यामुळे अकरावीत प्रवेशही मिळावा आणि शैक्षणिक वर्षही वाया जाऊ नये, यासाठी नजीकच्या गावातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांचा कल आहे.
----------------
म्हणून घेणात गावात प्रवेश
शहरी भागात शिक्षणाचा खर्च झेपत नाही. त्यामुळे गावातील कनिष्ठ महाविद्यालयातच प्रवेशाला पसंती दिली जाणार आहे. खासगी शिकवणी, रूम भाड्याने करून राहणे हे शक्य होणार नाही. त्यापेक्षा घरच्या भाकरीवर दहावीनंतर शिक्षण गावातच बरे राहील.
- प्रमोद मेश्राम, विद्यार्थी
----------------
शहरात शिक्षणासाठी जावे, अशी मनोमन इच्छा आहे. मात्र, घरची परिस्थिती बेताचीच आहे. तसेही आईला शेतीकामासाठी हातभार लावावा लागतो. त्यामुळे घराबाहेर शिक्षणासाठी जाणे मला संयुक्तिक ठरणारे आहे. गावातील कनिष्ठ महाविद्यालयातच प्रवेश घेऊन पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करेल.
- पुष्पा मगर, विद्यार्थिनी.
------------
केंद्रीय प्रवेश समितीद्वारे प्रवेश व्हावेत
ऑफलाईन किंवा ऑनलाईन प्रणालीने अकरावी प्रवेश प्रक्रिया न राबविता ती केंद्रीय प्रवेश समितीने राबविल्यास सुकर होईल. अवघ्या ५० रुपयांच्या अर्जाद्वारे अकरावीत प्रवेश दिला जाईल. मागील १४ वर्षात हीच प्रक्रिया राबविली जात होती.
- अरविंद मंगळे, शिक्षणतज्ज्ञ
-----
विद्यार्थ्यांना विनाअडथळ्यांनी अकरावीत प्रवेश मिळावा, अशीच प्रणाली शिक्षण विभागाने राबविली पाहिजे. अगोदर कोरोनाने विद्यार्थी, पालक हैराण झाले आहेत. प्रवेशासाठी मारामार हाेता कामा नये. यंदा निकालाचा टक्का वाढल्याने प्रवेशाच्या जागादेखील वाढविण्यात याव्यात.
- प्रशांत राठी, संस्थाचालक.