अमरावती : विदर्भातील शेतकऱ्यांची शासनाने थट्टा चालवली आहे. पीक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. या मुद्यावरून विदर्भात अनेक ठिकाणी आंदोलनही सुरू आहे. असे असताना अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील गप्प का, असा सवाल काँग्रेस आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
अमरावती येथे पीकविम्याच्या मुद्यावर ‘सरकारनामा’शी गुरुवारी त्यांनी संवाद साधला. विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये शासन भेद करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शासनाने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मस्करी करणे लावली आहे. आपण या मुद्यावर विधिमंडळात आवाज उठविणार आहोत. त्यासाठी आधीच आपण प्रश्न दाखल केलाय. बीड जिल्ह्यामध्ये पीकविमा कंपनी २४१ कोटी रुपये देत आहे. बीडमध्ये शेतकरी राहतात, मग अमरावती जिल्ह्यात काय जनावरे राहतात काय, असा संतप्त सवालही आमदार ॲड. ठाकूर यांनी केला. अमरावती जिल्ह्यात १० हजार शेतकऱ्यांसाठी फक्त आठ लाख देण्यात आले आहेत, असे त्या म्हणाल्या.
पीक विम्याची ही रक्कम देत असताना अमरावतीचे पालकमंत्री आता गप्प का आहेत असे नमूद करीत त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले. शासन शेतकऱ्यांच्या मुद्यावर अजिबात गंभीर नाही. शासनाने शेतकऱ्यांना गृहीत धरणे बंद न केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरत आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विदर्भातील शेतकरी वेगळा, मराठवाड्यातील वेगळा, पश्चिम महाराष्ट्रातील वेगळा असा भेद आतापर्यंत कुणीही केला नव्हता. परंतु, सध्याचं शासन असा भेद करताना दिसतेय, असा आरोपही ॲड. आमदार ठाकूर यांनी केला आहे.